• धारावीत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री दोन दुकाने फोडली
SHARE

धारावी - बंद दुकानाचे शटर तोडून हजारो रुपयांच्या रोकडसह दुकानातील खाद्यपदार्थ लांबवल्याची घटना मंगळवारी पहाटे धारावी क्रॉस रोडवरील अण्णानगर परिसरात घडली. याप्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा झाला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली.

दुकान मालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णा नगरच्या नवजीवन को. ऑप. हाउसिंग सोसायटीत राहणारे अंबिका प्रोव्हिजन स्टोअरचे मालक मनोहर गणपती आणि टागोरनगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटीमधील सतगुरू केमिस्टचे मालक दुकान बंद करून नेहमीप्रमाणे आपल्या घरी गेले होते. मात्र पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर तोडत अंबिका स्टोअरच्या गल्ल्यातील हजारो रुपयांची रोकड आणि दुकानातील खाण्याच्या वस्तू लांबवल्या. तर सतगुरू केमिस्ट औषधाच्या दुकानात रोकड न सापडल्याने शटर तोडून चोरट्यांनी काढता पाय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून अण्णानगर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असल्याचं तिथल्या रहिवाशांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या