कल्याणपर्यंतचा प्रवास करून लॅपटॉप घरी आला...


कल्याणपर्यंतचा प्रवास करून लॅपटॉप घरी आला...
SHARES

ट्रेनमध्ये एखादी वस्तू गहाळ झाल्यास ती मिळण्याची शक्यता तशी कमीच. अपवाद फक्त ही वस्तू सुरक्षितरीत्या रेल्वे पोलिसांच्या हाती पडली पाहिजे. याचाच प्रत्यय डोंबिवलीत राहणाऱ्या एका महिला प्रवाशाला आला. अत्यंत महत्त्वाचा डेटा असलेला महागडा लॅपटॉप या महिला प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाला.

निशिगंधा म्हात्रे यांनी शुक्रवारी दादर येथून दुपारी 1.10 वाजताची कल्याण लोकल पकडली. यावेळी त्यांच्याकडे 45 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप होता. गर्दी असल्याने त्यांनी आपली लॅपटॉपची बॅग सामानाच्या रॅकमध्ये ठेवली. काही मिनिटांनी ही लोकल डोंबिवली स्थानकावर आल्यानंतर निशिगंधा घाईगडबडीत लोकलमधून खाली उतरल्या. रॅकवर ठेवलेली लॅपटॉपची बॅग घेण्यास मात्र त्या विसरल्या. डोंबिवलीतील घरी पोहोचल्यानंतर अचानक त्यांना लॅपटॉपची बॅग लोकलमध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने डोंबिवली स्थानक गाठून रेल्वे पोलिसांना लॅपटॉप हरविल्याची माहिती दिली. ही माहिती रेल्वे सुरक्षा बल नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली.

कल्याणहून निघालेल्या या लोकलने घाटकोपर स्थानकापर्यंतचा पल्ला गाठला होता. तोपर्यंत नियंत्रण कक्षातून घाटकोपरच्या रेल्वे सुरक्षा बलापर्यंत ही माहिती पोहोचली. ही लोकल घाटकोपर रेल्वे स्थानकात येताच सुरक्षा बलचे उपनिरिक्षक ब्रिजेश कुमार आणि जे. पी. सिंग यांनी संपूर्ण लोकलची तपासणी करून ही बॅग रॅकवरून ताब्यात घेतली आणि बॅग सापडल्याची माहिती निशिगंधा यांना दिली.

महागडा लॅपटॉप आणि त्यातील महत्वाचा डेटा हरवल्याने चिंताग्रस्त झालेल्या निशिगंधा लॅपटॉप हाती पडताच आनंदून गेल्या. यावेळी त्यांनी तत्परता दाखवणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलचे आभार मानले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा