साकीनाका बलात्कारप्रकरणी 'अ‍ॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

साकीनाका बलात्कारप्रकरणी 'अ‍ॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल
SHARES

संपूर्ण मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धुम पाहायला मिळते आहे. सर्वत्र गणरायाचा जयघोष सुरू आहे. अशातच या मंगलमय वातावरणात एका मन सुन्न करणारी घटना घडली. मुंबईला शुक्रवारी पहाटे साकीनाका परिसरात एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पो चालकानं अमानुष लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अंधेरी साकीनाका परिसरात राहणारा आरोपी मोहन चौहान याने पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे देशभर अस्वस्थता निर्माण केलेल्या २०१२मधील निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेतील क्रौर्याची आठवण जागी केली.

आरोपीने पीडितेच्या गुप्तांगात क्रूरपणे गंभीर जखमा केल्या. त्यामुळे ती बेशुद्धावस्थेत होती. उपचार घेत असताना तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. पीडित महिला साकीनाका भागातील खैराणी रस्ता परिसरात राहत होती. टेम्पो चालक असलेला आरोपी मोहन काम नसल्यावर त्याच परिसरात कचरा वेचण्याचे काम करतो. तोही त्याच भागात पदपथावर किंवा टेम्पोमध्ये राहतो. या परिसरात असलेल्या गोदामातील सुरक्षारक्षकाने एका महिलेला कोणीतरी मारहाण करीत असल्याची तक्रार शुक्रवारी पहाटे पोलिसांकडे दूरध्वनीद्वारे केली.

साकीनाका पोलीस ठाण्यातील अधिकारी १० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना जवळच असलेल्या वाहनात पीडित महिला गंभीर अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर 'सीसीटीव्ही' चित्रीकरणाच्या साहाय्यानं आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपीला या परिसरातील जंगलेश्वर मंदिरासमोरून शुक्रवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. संबंधित आरोपी हा उत्तर प्रदेशातील जौहनपूर या आपल्या मूळ गावी पळून जात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोपीला न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पीडितेच्या मृतदेहाचे जे. जे. रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच चौकशीसाठी साहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जलदगतीने तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले जाईल.

पीडित महिलेची स्थिती अत्यंत गंभीर होती. तिला तात्काळ उपचारांची आवश्यकता होती. त्या अवस्थेत रुग्णवाहिका येईपर्यंत महिलेला तेथे ठेवणे धोकादायक होते. त्यामुळे साकीनाका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार यांनी तेथील कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून टेम्पोची चावी घेतली. या पोलीस कर्मचाऱ्यानेच टेम्पो चालवून पीडितेला रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर शुक्रवारी पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराच्या गुन्ह्यासह खुनाचे कलम समाविष्ट केले होते. त्यानंतर अ‍ॅट्रॅसिटीच्या कलमाचाही समावेश केला आहे. साकीनाका इथं शुक्रवारी पहाटे ३४ वर्षीय महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आरोपी मोहन चौहान याने पीडितेच्या गुप्तांगावर गंभीर जखमा केल्या होत्या. उपचारांदरम्यान पीडितेचे शनिवारी सकाळी राजावाडी रुग्णालयात निधन झाले. तिच्या मृतदेहाचे जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

पीडितेच्या कुटुंबीयांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी रविवारी भेट घेतली. तसेच गुन्हा घडला त्या ठिकाणाचीही आयोगाने पाहणी केली. त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हालदार यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा