वडाळा पोलिसांनी केली सलमान खानला अटक

  wadala
  वडाळा पोलिसांनी केली सलमान खानला अटक
  मुंबई  -  

  मोकाट फिरत असलेल्या सलमान खान नावाच्या एका तडीपार गुंडाच्या मुसक्या वडाळा टीटी पोलिसांनी आवळल्यात. खंडणीसाठी या तडीपार गुंडाने एका तरुणीला बांबूने जबर मारहाण केल्याची गंभीर घटना वडाळ्यात गुरुवारी घडली होती. सदरील घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या गुंडाविरोधात गुन्हा नोंदवला. तेव्हापासून पोलीस या तडीपार गुंडाच्या मागावर होते. या घटनेतील आरोपी मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना शनिवारी एका गुप्त बातमीदाराकडून समजताच सापळा रचून वडाळा पोलिसांनी त्याला रविवारी पहाटे अटक केली.

  20 एप्रिल रोजी घराशेजारी बसलेल्या रेश्माकडे या तडीपार गुंडाने नशा करण्यासाठी पैशाची मागणी केली होती. त्यावेळी रेश्माने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे नशेचं व्यसन असलेल्या सलमान खानचा राग अनावर झाला. त्याने तात्काळ बाजूला पडलेला बांबू उचलून रेश्माला मारहाण करण्यास सुरुवात केली. रक्तबंबाळ होईपर्यंत त्याने तिला मारले आणि पळून गेला. विभागात त्याची दहशत असल्याने शेजाऱ्यांनी बघ्याची भूमिका बजावली. दरम्यान, रेश्माच्या नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल केले होते. सदर घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी या तडीपार गुंडाला तात्काळ पकडण्याचे आदेश दिले. पोलीस मागावर असल्याचे कळताच तडीपार गुंड सलमान सलीम खान ( 22) याने घटनास्थळावरून पोबारा केला होता. शनिवारी रात्री एका गुप्त बातमीदाराने सलमान खान वडाळ्याच्या आझाद मोहल्ला परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी त्याला अटक केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.