शिवसेना नगरसेवक अशोक सावंत हत्या प्रकरण, दोघांना सांगलीतून अटक


शिवसेना नगरसेवक अशोक सावंत हत्या प्रकरण, दोघांना सांगलीतून अटक
SHARES

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उपविभाग प्रमुख अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी समता नगर पोलिसांनी दोघांना सांगलीतून अटक केली आहे. जगदीश शिवराम पवार आणि अभिषेक सुदाम माने अशी अटक आरोपींची दोघांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात समता नगर पोलिसांना यश आलं आहे.


धारदार शस्त्राने हत्या

कांदिवलीच्या समतानगर परिसरात राहणारे सावंत हे कट्टर शिवसैनिक होते. बोरिवलीतील मागाठणे येथील विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. याच भागात सावंत यांचा केबलचा व्यवसाय होता. दरम्यान ७ जानेवारीला अशोक सावंत हे मित्रांसोबत घरी जात असताना. ठाकूर कॉम्प्लेक्सजवळ रिक्षातून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर समतानगर पोलिसांनी अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली.


सर्व आरोपींना अटक

हत्येत सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाने पैशांसाठी हत्या केल्याची कबुली देत इतर दोन साथीदारांची नावे सांगितली. हत्येच्या कटात सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र याप्रकरणातील मुख्य आरोपी पवार आणि माने सापडत नव्हते. अखेर आरोपी सांगलीत लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना नेर्ले गावातून अटक केली. आरोपींच्या चौकशीत हत्येनंतर ते कोल्हापूर, रायगड, सांगली, पुणे, गोवा आणि विरार या ठिकाणी लपून होते. दोघांविरोधातही यापूर्वी गुन्हे दाखल होते. त्यात माने विरोधात मारहाणीचा, तर जाधव विरोधात १९९३ मध्ये एक हत्येचा गुन्हा दाखल होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा