शाळेत प्रवेश देण्याच्या नावावर 30 हजारांना गंडा

 Mumbai
शाळेत प्रवेश देण्याच्या नावावर 30 हजारांना गंडा

भांडुप - शाळेत मुलांना प्रवेश देतो असं सांगून आणि पालकांना हजारो रुपयांना गंडा घालणाऱ्या हेमंत देवाडीया याला भांडुप पोलिसांनी अटक केलीय. आरोपी देवाडीया याने राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांचा भाचा असल्याचं सांगून गंडा घातला. भांडुपमध्ये कुटुंबासह राहणाऱ्या प्रशांत कदम यांनी त्यांच्या मुलाला ज्युनियर केजीमध्ये प्रवेशासाठी कांजुरमार्ग येथील सेंट झेवियर्स शाळेमध्ये अर्ज केला होता.

शाळेने हा अर्ज नाकारला म्हणून कदम यांनी खासदार पाटील यांचा भाचा देवाडीया याची भेट घेतली. त्याने पाटील यांच्या ओळखिने शाळेच्या मॅनेजमेंट कोट्यातून मुलाला प्रवेश मिळवून देतो, असं आमिष दाखवलं. त्यानुसार कदम यांनी त्याला 30 हजार रुपये दिले. देवाडीया याने खासदाराच्या नावाने शाळेत प्रवेश मिळाल्याचे एक पत्र कदम यांना दिले. हे पत्र घेऊन कदम शाळेत गेले असता देवाडीयाची भांडाफोड झाली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कदम यांनी १३ आक्टोबरला भांडुप पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. भांडुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन गिजे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि देवाडीया याच्यावर गुन्हा दाखल करून भांडुपच्या सर्वोदयनगर परिसरातून बेड्या ठोकल्या. देवाडीयाच्या विरोधात आतापर्यंत सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यानुसार देवाडीयाला न्यायालयाने ५ नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले.

Loading Comments