तक्रार केली म्हणून शाळकरी मुलाने शिक्षिकेचाच जीव घेतला


तक्रार केली म्हणून शाळकरी मुलाने शिक्षिकेचाच जीव घेतला
SHARES

मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचा चढता आलेख चिंता वाढवणारा आहे. पोलिसांसाठीही आणि सामान्य मुंबईकरांसाठीही. त्यातच आता शाळकरी मुलांमध्येही आक्रमक वृत्ती वाढल्यामुळे गुन्हेगारी घटनांचं प्रमाण वाढू लागलं आहे. डोंबिवलीजवळच्या कोपरममध्ये एका शाळकरी मुलाने आपल्या वृद्ध शिक्षिकेचीच निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. आणि तीही आईकडे आपली तक्रार केल्यामुळे.


का केली मुलाने हत्या?

कोपरच्या परशुराम सोसायटीमध्ये ६५ वर्षीय मनीषा खानोलकर आपल्या राहत्या घरीच मुलांची शिकवणी घ्यायच्या. आरोपी अल्पवयीन मुलगा त्यांच्याकडे शिकवणीसाठी येत होता. आठवड्याभरापूर्वीच मनीषा खानोलकर यांनी मुलाच्या आईकडे त्याची कुठल्याशा कारणासाठी तक्रार केली. यामुळे संतापलेल्या मुलाने याचा बदला घ्यायचं ठरवलं.


डोक्यात घातला प्रेशर कुकर

मंगळवारी संध्याकारळच्या सुमारास जेव्हा मनीषा घरी एकट्याच होत्या, तेव्हा आरोपी मुलगा त्यांच्या घरी गेला. मनीषा या काहीतरी करण्यासाठी पाठमोऱ्या उभ्या असताना आरोपी मुलाने त्यांच्या डोक्यावर रिकामा प्रेशर कुकर जोरात मारला. त्यानंतर चाकू भोसकून त्यांची निर्घृण हत्या केली.

यासंदर्भात कल्याण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयीन आदेशांनुसार ८ फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा