मालमत्तेच्या वादातून वडिलांची दगडाने ठेचून हत्या

  Palghar
  मालमत्तेच्या वादातून वडिलांची दगडाने ठेचून हत्या
  मुंबई  -  

  मालमत्तेच्या वादातून एका मुलाने आपल्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार पालघर जिल्ह्यातील जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याच्यावर भादंविच्या 302 आणि 506 कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाराम धवलू वाघ (50) आपल्या कुटुंबासहित जव्हारमधील भूरिटेक गावात रहात होते. मागील काही दिवसांपासून गंगाराम आणि त्यांच्या मुलाचे मालमत्तेच्या वाटपावरून सतत वाद होत होते. याच वादातून मुलाने आपल्या वडिलांना दगडाने मारहाण केली. या मारहाणीत गंगाराम यांचा जागीच मृत्यू झाला. गंगाराम यांच्या पत्नीने जव्हार पोलिसांत धाव घेऊन आपल्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी जाऊन गंगाराम यांचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

  याप्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले की, पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत आरोपी मुलाला अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.