जेएनयूमधील हल्ल्याचे मुंबई, पुण्यात पडसाद

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथं मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला.

जेएनयूमधील हल्ल्याचे मुंबई, पुण्यात पडसाद
SHARES

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (जेएनयू)च्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र आता या हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात उमटू लागले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथं मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला. तसंच, पुण्यामधील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.

कँडल मार्च

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी गर्दी केली. यावेळी कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. मध्यरात्रीची वेळ असूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या मार्चमध्ये सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गानं हे आंदोलन करण्यात आले. मुंबईत सोमवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हुतात्मा चौकात या हल्ल्याचा संशय असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शनं करण्यात येणार आहेत. 'जॉइंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिस'च्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात येणार आहेत.


निषेधाच्या घोषणा

पुण्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत जेएनयूतील हल्ल्याचा विरोध केला. यावेळी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच, पुण्यातही संध्याकाळी ७ वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार आहे.

तणावाचं वातावरण

जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकच खळबळ माजली आहे. तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, रात्रभर कॅम्पस, एम्स तसंच दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना भेटू दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

यांचाही विरोध

दिल्लीतील या घटनेचा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'हिंसाचाराची जी दृष्ये समोर आली आहेत ती भीतीदायक आहेत. विद्यापीठात अशा घटनेला थारा असता नये. विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित असण्याची गरज आहे’, असं सीतारामन यांनी म्हटलं. तसंच, 'विद्यापीठात जे घडले ते विद्यापीठाची परंपरा आणि संस्कृतीला छेद देणारे आहे’, असं जयशंकर यांनी नमूद करत आपला निषेध नोंदवला.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा