Advertisement

अखेर निर्भयाला न्याय मिळाला


SHARES
Advertisement

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2012 सालच्या डिसेंबरमध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात अखेर 4 वर्षांनंतर पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना उच्च न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारच्या सुनावणीत कायम ठेवली आहे. "हा आपल्या कुटुंबियांचा विजय असून या निर्णयामुळे मी खूप आनंदात आहे. निकाल यायला उशीर झाला असला तरी आता कोणतीही तक्रार नाही", अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या वडिलांनी दिली.

दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री एका चालत्या बसमध्ये 23 वर्षीय तरुणीवर 6 नराधमांनी मिळून नृशंसरित्या सामूहिक बलात्कार केला. यानंतर उपचारांदरम्यान 29 डिसेंबर रोजी तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी उच्च न्यायालयाने पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि मुकेश सिंह या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणातल्या आरोपी राम सिंह याचा सुनावणीदरम्यान तुरुंगातच मृत्यू झाला. तर सहाव्या अल्पवयीन आरोपीला बालगुन्हेगार न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

उच्च न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या निर्णयाविरोधात आरोपींच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

निर्भयाला न्याय मिळाल्यानंतर मुंबईकरांनी देखील आनंद व्यक्त केलाय. यासंदर्भात काही तरुण मुंबई करांच्या प्रतिक्रिया... 


निर्भया प्रकरणी बहुप्रतीक्षित निकाल जाहीर झाला आणि या देशाचा नागरिक म्हणून न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला. या निकालामुळे भविष्यात होणाऱ्या अशा कृतींवर आळा बसेल असा विश्वास मला वाटतो. मात्र तरीही शिक्षेच्या भीतीपेक्षा नागरिकांच्या मनात स्त्रीविषयी आदर निर्माण होणे जास्त गरजेचं आहे.
- अजिंक्य म्हाडगूत, मुंबईकर

निर्भया प्रकरणापेक्षा वाईट प्रकरण असूच शकत नाही. त्यामुळे आरोपींना झालेली शिक्षा या आधीच होणे अपेक्षीत होतं. केवळ शिक्षेच्या भीतीपोटी नाही, तर प्रत्येक पुरुषाने स्त्रीकडे आदरानेच बघितलं पाहीजे. पुन्हा अशाप्रकारची वर्तवणूक करताना मुले हजार वेळा विचार करतील.
- प्राजक्ता खोत, मुंबईकर

निर्भया बलात्कार आणि हत्या या 2012 सालच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, पण इतका उशीर का झाला याची मनाला कुठेतरी खंत वाटत आहे.
- भाग्येश नागवेकर, मुंबईकर

एक मुलगी म्हणून मला या निकालाचा आनंद आहेच.  त्या मुलीला आणि तिच्यासाठी झगडणाऱ्यांना 4 वर्षांनी का होईना पण न्याय मिळाला. फाशीची शिक्षा योग्यच आहे. पण, माझ्या मते या गुन्ह्याला फाशीची शिक्षाही पुरेशी नाही. तिने ज्या वेदना सहन केल्या, त्यांची थोडी तरी झळ त्या गुन्हेगारांना पोहचली पाहिजे. जेणेकरून यापुढे असं करायची कोणी हिंमत करणार नाही.
- तन्वी मुंडले, मुंबईकर

दिल्लीत घडलेली ही घटना खुपच घृणास्पद आणि न विसरणारी आहे. 2012 मध्ये घटना घडली आणि गुन्हेगारांना शिक्षा 2017 मध्ये होते, म्हणजे आपल्या देशाचा कायदा हा खूपच हळूवार पद्धतीने चालतो. बलात्कार प्रकरणातल्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे गुन्हे करणाऱ्यांचे हात पाय कापले पाहिजेत. असे गुन्हे होत राहिले तर आम्ही मुंबईतही स्वत:ला सुरक्षित समजणार नाही.
- अक्षया झोरे, मुंबईकर

निर्भया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय अगदी योग्य आहे. फाशीपेक्षाही कडक शिक्षा या गुन्हेगारांना झाली पाहिजे होती. पण, यंत्रणा एवढी हळू का आहे, हाच प्रश्न आहे. त्यामुळे मुंबईतही महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडतो. ही सिस्टिम सुधारावी लागेल.
- सचिन हसम, मुंबईकर


अशा घाणेरड्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. फाशीपेक्षा आणखी कडक शिक्षा झाली पाहिजे.

- पूजा भावसार, मुंबईकरसंबंधित विषय
Advertisement