चोरीसाठी 'त्याने' निवडला टॅक्सी चालकाचा पेशा


चोरीसाठी 'त्याने' निवडला टॅक्सी चालकाचा पेशा
SHARES

झटपट श्रीमंत होण्यासाठी उच्चभ्रू वस्तीतील गाड्यांचे टायर चोरी करणाऱ्या सराईत चोराला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत कांबळे असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात आतापर्यंत सहा गुन्ह्यांची नोंद आहे.


कशी करायचा चोरी?

भायखळा परिसरात राहणारा चंद्रकांत कांबळे हा भाड्याने दुसऱ्याची टॅक्सी चालवतो. श्रीमंत होण्यासाठी त्याने अनेक खटपटीही केल्या. मात्र त्यात त्याला यश आलं नाही म्हणून मग आपल्या व्यवसायातील चालकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याने रात्रीच्या वेळी गाड्यांचे टायर चोरण्यास सुरुवात केली. ही चोरी करताना तो फार खबरदारी घ्यायचा. दिवसभर टॅक्सी चालवून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी तो आपली टॅक्सी घेऊन उच्चभ्रूवस्तीत भाड्याच्या शोधात उभा रहायचा. याचबरोबर ज्या गाड्या टॅक्सीसाठी वापरल्या जातात. (उदा. सेन्ट्रो, रिट्झ, आय टेन, मारुती) या उच्चभ्रू वस्तीत उभ्या असलेल्या खासगी गाड्यांच्या शेजारी तो आपली टॅक्सी उभी करत खासगी कारला दगडांचा टेकू लावून तो टायर चोरायचा. अनेक वेळा पोलिसांना तो या ठिकाणी दिसायचा.

अखेर चोरी पकडली

त्याच्यावर यापूर्वी मलबार हिल पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान रविवारी रात्री पोलिस गस्तीसाठी फिरत असताना तो एका खासगी गाडीच्या जवळ संशयास्पद काही तरी करत होता आणि ते पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा पोलिसांना असमाधानकारक उत्तर मिळाल्याने त्यांनी कांबळेची झडती घेतली असता त्याची चोरी उघडकीस आली.

तो गाड्यांचे चोरलेले टायर इतर टॅक्सी चालकांना कमी पैशात विकून बक्कळ पैसे कमवायचा. दिवसाला दोन तरी टायर तो विकायचाच. बाजारात अडीच हजार रुपयांना मिळाणारा टायर कांबळे १८०० रुपयांना विकत असल्याचं पोलिसांच्या चौकशीतून पुढे आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा