मुंबईत ‘२६/११’सारखा हल्ला करण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

पोलिस नियंत्रण कक्षाला पाकिस्तानमधून व्हॉट्सअॅप मेसेज आला.

मुंबईत ‘२६/११’सारखा हल्ला करण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क
SHARES

मुंबईजवळ रायगडच्या हिरहिरेश्वर समुद्रकिनारी काही दिवसांपूर्वी एके ४७ रायफलने भरलेली बोट जप्त करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रात हाय अलर्ट जाहीर केला होता. मात्र, आता पोलिसांना आणखी एक नवी धमकी मिळाली आहे.

मुंबई शहरात ‘२६/११’सारखा हल्ला करण्याच्या धमकीचा संदेश वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदेशानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

एका व्यक्तीकडून शुक्रवारी पावणेबाराच्या दरम्यान वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे अनेक संदेश आले. यामध्ये ‘२६/११’सारखा हल्ला करण्याची धमकीचा संदेश होता.

दहशतवादी अजमल कसाब, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात ठार झालेला ‘अल-कायदा’चा प्रमुख अल-जवाहिरी याचा उल्लेखही असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. या धमकीच्या संदेशात सहा जणांचे मोबाइल क्रमांकही पाठवले असून, पाकिस्तानी मोबाइल क्रमांकावरून संदेश पाठवण्यात आले होते.

राज्य ‘एटीएस’ला देखील याबाबत कळविले असून, केंद्रीय तपास यंत्रणांनादेखील याची माहिती दिल्याचे फणसळकर यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यात सण-उत्सवाचे वातावरण आहे. त्याला गालबोट लागू नये याबाबत आम्ही गंभीर असून, मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास आम्ही तत्पर असल्याचे फणसळकर म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी एका संशयिताला विरार येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

विरारमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचा मोबाइल क्रमांक धमकीच्या संदेशात नमूद करण्यात आला होता. याशिवाय आणखी पाच मोबाइल क्रमांक धमकीच्या संदेशात होते. त्यातील एक मोबाइल क्रमांक उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकातील एका अधिकाऱ्याचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मृत गायक सिद्धू मुसेवाला याच्या नावाचाही उल्लेख धमकीत करण्यात आला होता.

धमकीच्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेला सतर्क केले आहे. सागरी सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले असून, ‘सागर कवच’ मोहीमदेखील सुरू आहे. प्रत्येक संदेशाची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती  फणसळकर यांनी दिली. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा