ठाण्यातून तब्बल 9 किलो युरेनियम जप्त

 Pali Hill
ठाण्यातून तब्बल 9 किलो युरेनियम जप्त

मुंबई - मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात आठ किलो 861 ग्रॅम युरेनियम पकडण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस आयुक्तालयात सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील बाइक हॉटेलच्या जवळ दोन व्यक्ती युरेनियम विकण्यासाठी आले होते. त्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून दोघा संशयितांना अटक करत घातक युरेनियम जप्त केले. अटक आरोपींमध्ये किशोर प्रजापती आणि सैफुल्ला खान यांचा समावेश आहे.

त्याची किंमत 27 कोटी असून तीन कोटी रुपये किलो दराने विकण्याचा आरोपींचा मानस होता अशी माहिती पोलिसांनी दिली

'पकडण्यात आलेले युरेनियम हा रेडियोएक्टिव्ह पदार्थ आहे. हा पदार्थ सोबत किंवा साठवण्यासाठी एटोमिक एनर्जी कायद्यानुसार परवाना आवश्यक आहे. दरम्यान हा साठा भारतातील नसल्याचंही तपासात आढळल्याचं ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितलं. अटक आरोपी अशा प्रकारच्या हेराफ़ेरीत सामील आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. तसंच पाकिस्तानातून अशा प्रकारचे युरेनियम गायब झाल्याचं वृत्त होतं हे तेच युरेनियम आहे का याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं डुमरे यांनी स्पष्ट केलं.

Loading Comments