मंत्रालयासमोर चोरी, सीसीटीव्हीत चोर कैद

Nariman Point, Mumbai  -  

सीएसटी - महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयापासून अगदी काही पावलांवर असलेलं 'डी वाईब' नावाचं डिझाइनर कपड्यांचं दुकान. हे दुकान अशा ठिकाणी आहे जिथे 24 तास कडक पहारा असतो. पण असं असताना देखील सोमवारी या दुकानात भरदिवसा चोरी झाली. सकाळी स्टोअरची मॅनेजर दुकानात एकटीच होती. त्यावेळी एक इसम तिथे आला आणि मॅनेजरकडे वर्गणीची मागणी करू लागला. आपले सर्टिफिकेट दाखवण्यासाठी तो काउंटरच्या जवळ गेला पण त्याचा खरा हेतू काही वेगळाच होता. आपल्या कागदपत्रांचा आडोसा घेऊन या चोराने मॅनेजरचा 57 हजार रुपयांचा मोबाईलच लंपास केला.

तुम्हाला नवल वाटेल की या दुकानात गेल्या पाच महिन्यात तब्बल चार वेळा चोरीचा प्रयत्न झालाय. दोनदा प्रत्यक्ष चोऱ्या झाल्या असून, दोनवेळा या दुकानाचे शटर तोडण्यात आले होते. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पण पोलीस अजूनही आरोपीचा शोध घेत आहेत. मंत्रालयासारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी अशा सातत्याने चोऱ्या होत असतील आणि आरोपी असे मोकाट राहत असतील तर उर्वरित मुंबईबद्दल भाष्य न केलेलंच बरं असंच म्हणावं लागेल. या प्रकारामुळे दुकानाच्या मालकीण तसेच फॅशन डिझायनर देविका पाटकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

गेल्या पाच महिन्यांत चार वेळा इथे चोऱ्या झाल्या. प्रत्येक वेळचं सीसीटीव्ही फुटेजही मी पोलिसांना दिलं. मात्र अजूनही चोराचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. विधान भवन सारख्या अतिसुरक्षित परिसरात चोरी होत असेल तर उर्वरित मुंबईची कल्पना न केलेलीच बरी अशा शब्दांत देविका पाटकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Loading Comments