अंधेरीत साडेतीन वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; ट्रस्टी, शिक्षिकेविरोधात गुन्हा

 Andheri
अंधेरीत साडेतीन वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; ट्रस्टी, शिक्षिकेविरोधात गुन्हा
Andheri, Mumbai  -  

अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी एका नामांकित शाळेचे ट्रस्टी आणि शिक्षिकेविरोधात साडेतीन वर्षीय विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 'आयजीसीएसई' बोर्डचा हा ट्रस्टी जर्मन नागरीक असून मागील अनेक वर्षांपासून तो भारतात रहात आहे.

अंधेरी पूर्वेला असलेली ही शाळा अतिशय नामांकित असून या शाळेत सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलांसह मंत्र्यांची मुलेदेखील शिकतात. पीडित मुलगी या शाळेत नर्सरीमध्ये शिकत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या वागण्यात अचानक बदल झाल्याने आईने तिची चौकशी केल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. मुलीने आपल्या आईला सांगितले की, काही महिन्यांपूर्वी शाळेच्या एका शिक्षिकेने तिला आणि आणखीन एका विद्यार्थिनीला शाळेच्या ट्रस्टींच्या खोलीत नेले. जिथे तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले.

हे समजताच पीडित मुलीच्या आईने त्वरीत एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्यानंतर शाळेचे ट्रस्टी आणि शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अजून या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. 18 मे रोजी या प्रकरणी आम्ही कलम 376, 354 तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती झोन 10 चे डीसीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

सांगितले जात आहे की, गुन्हा दाखल होताच या ट्रस्टी महाशयांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाने तो फेटाळला. सध्या हे ट्रस्टी परदेशात असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. आणखीन किती मुलींना या ट्रस्टीने आपले शिकार बनवले आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Loading Comments