गडचिरोलीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांना मुंबईच्या लोकलमध्ये श्रद्धांजली


गडचिरोलीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांना मुंबईच्या लोकलमध्ये श्रद्धांजली
SHARES

सुरक्षा दलाने काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यांतील ३० नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. त्यावेळी सुरक्षा दलाच्या या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. मात्र मुंबईच्या लोकलमध्ये याच मृत पावलेल्या नक्षलवाद्यांकरता श्रद्धांजलीचे मजकूर लिहिल्याचं आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल होताच तपासाला वेग आला आहे.


प्रवाशांनी दिली माहिती

मुंबईच्या हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या प्रथमश्रेणी डब्यात हे श्रद्धांजलीचे मजकूल लिहिण्यात आले होते. १७ मे रोजी ही बाब सतर्क प्रवाशांनी रेल्वे पोलिसांच्या लक्षात आणून दिली. या डब्यात ‘रेल सॅल्यूट्स टू दी गडचिरोली मार्टियर्स’ आणि ‘लाँग लिव्ह द रेव्होल्युशन’ अशा प्रकारचे मजकूर तीन ते चार ठिकाणी डब्यामध्ये लिहिण्यात आले होते. यासोबतच नक्षलवादी संघटनांची चिन्हंही काढली होती.


रेल्वे पोलिसांनी घेतली दखल

या प्रकरणाची गंभीर दखल रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबधित रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं आहे. सध्या यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा