दादर चौपाटीवर देवीच्या विसर्जन मिरवणुकीत एकाची हत्या


दादर चौपाटीवर देवीच्या विसर्जन मिरवणुकीत एकाची हत्या
SHARES

गुरुवारी देवी विसर्जनासाठी आलेल्या दोन मंडळांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन एकाची हत्या झाल्याची घटना दादरमध्ये घडली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.


किरकोळ वादाचं रुपांतर हाणामारीत

मुंबईच्या दादर चौपाटीवर मानखुर्द येथील जय भवानी महिला उत्सव मंडळ आणि धारावी येथील जय अंबे मित्र मंडळाच्या देवी विसर्जनासाठी आले होते. या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत किरकोळ कारणांवरून दोन मंडळामध्ये रात्री 1. वा. वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, शाब्दीक भांडण हाणामारीवर जाऊन पोहचलं. या वादात जय भवानी महिला उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जगदीश नंदू कदम याला जय अंबे मित्र मंडळाच्या अविनाश नलावडे (१९) आणि स्टेलिन यशवंत पुजारी (१९) यांनी बेदम मारहाण केली.


दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल

या घटनेनंतर शिवाजी पार्क पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचलं आणि गंभीर जखमी झालेल्या जगदीशला केईएम रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अविनाश आणि स्टेलिनला भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अटक करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी जगदीशचा मृत्यू झाल्याने या दोघांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा