मुंबईतील SBI बँकेत दरोडा घालणाऱ्या दोघांना अटक

अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबईतील SBI बँकेत दरोडा घालणाऱ्या दोघांना अटक
SHARES

मुंबईत बँकेच्या शाखेत दरोडा टाकून खून करणाऱ्या (SBI Branch Robbery and Murder) दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दहिसर पश्चिम भागातील एसबीआय बँकेच्या शाखेत भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चोरी झाल्यानंतर बुधवारी मुंबई पोलिसांचे पथक बँकेत पोहोचले आणि बँकेत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीनं दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांना आरोपीचे बूट सापडले होते. त्या बुटाचा माग काढत मुंबई पोलिसांचे श्वान पथक लपलेल्या आरोपींपर्यंत पोहोचले. त्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांना आरोपीचे बूट सापडले होते, त्या बुटाचा वास आल्यानंतर मुंबई पोलिसांचा कुत्रा आरोपीच्या घरापर्यंत पोहोचला, त्यानंतर पोलिसांनी प्रथम दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताही प्रतिसाद न आल्यानं क्राइम ब्रँच आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडला, तिथे एक आरोपी लपला होता.

त्यानंतर काही वेळातच त्याच परिसरात आणखी एक आरोपी लपून बसल्याचं पोलिसांना आढळून आलं. विकास यादव आणि धर्मेंद्र यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून दोघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दहिसरमधील जीएस रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India Dahisar Branch) शाखेत बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चेहरा झाकलेले दोघे जण अचानक बंदुक घेऊन घुसले होते. आधी त्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर अडीच लाख रुपये लुटून पळ काढला.

संपूर्ण घटना बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यापैकी एकानं सफेद रंगाचा, तर दुसऱ्यानं काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. दोघांनीही तोंडाला कपडा बांधल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं होतं.

या घटनेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी बँक कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आठ विशेष पथकं तयार केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना दहिसर परिसरातून अटक करण्यात आली आहे.



हेही वाचा

बनावट लसीकरण सर्टिफिकेट विकणाऱ्या दोघांना अटक

१८ केनियन महिला सोने तस्करी प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा