मानखुर्दमध्ये 12 तासांचं अग्नितांडव

मानखुर्द -  धुमसती आग आणि स्थानिकांच्या जिवाचा आकांत. हे चित्र होतं मानखुर्दच्या मंडाला परिसरातलं. गुरूवारी संध्याकाळी पाचच्या सुमाराला इथल्या झोपडपट्टीमध्ये असलेल्या तेलाच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीत आसपासच्या कित्येक झोपड्या आणि भंगाराची गोदामं जळून खाक झाली.तब्बल 12 तास धुमसणा-या या आगीत होत्याचं नव्हतं झालं.

अवघ्या पाच मिनिटांवर अग्निशमन केंद्र असूनही गाड्या येण्यासाठी एक ते दीड तास उशीर झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. यात राजू यादव आणि अजू पाल हे तरूण गंभीर झाले. त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे अग्नितांडव काही सिलिंडर फुटल्याने वाढल्याचंही स्थानिकांचं म्हणणंय.

आगीमुळे आजूबाजूच्या तब्बल ४०० झोपड्या तात्काळ रिकाम्या करण्यात आल्या. दरम्यान, आगीच्या घटनेनंतर परिसरातील २ हजार रहिवाशांना नजीकच्या शाळांमध्ये हलवण्यात आल्यानं मोठी हानी टळली. अग्निशमन दलाच्या एकूण 25 गाड्या, 15 ते 20 पाण्याचे टँकर यांच्या प्रयत्नांनंतर तब्बल 12 तासांनी ही आग आटोक्यात आली आणि मानखुर्दचं अग्नीतांडव शांत झालं.

Loading Comments