बोगस अनुभवाचे सर्टिफिकेट दिल्याप्रकरणी 'एमएमआरडीए'चे दोन अभियंते निलंबित


बोगस अनुभवाचे सर्टिफिकेट दिल्याप्रकरणी 'एमएमआरडीए'चे दोन अभियंते निलंबित
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अतिरिक्त मुख्य अभियंता ए. के. पहल आणि कार्यकारी अभियंता पी. के. वेणी या दोघांना बुधवारी 'एमएमआरडीए'ने निलंबित केल्याची माहिती 'एमएमआरडीए'तील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. या दोघांनी एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला 'एमएमआरडीए'साठी काम केल्याचा अऩुभव असल्यासंबंधीचे बोगस सर्टिफिकेट देत मदत केल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पहल आणि वेणी यांनी दिलेल्या बोगस सर्टिफिकेटच्या जोरावर एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीने हरियाणातील एका प्रकल्पासाठी निविदा सादर करत कंत्राट मिळवले होते. दरम्यान हरियाणातील ज्या कंपनीच्या कामासाठी कंत्राट मिळाले होते, त्या कंपनीने 'एमएमआरडीए'साठी काम केल्याचा अनुभव या कंपनीला आहे का? याबद्दल विचारणा केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.

'एमएमआरडीए'ने या प्रकरणाची चौकशी केली असता एन. ए. कन्स्ट्रक्शनने 'एमएमआरडीए'साठी कंत्राटदार म्हणून कोणत्याही प्रकारचे काम केले नसल्याचे निष्पन्न झाले. त्याअऩुषंगाने या दोघा अभियंत्यांनी या कंत्राटदार कंपनीला बोगस सर्टिफिकेट दिल्याचेही उघड झाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे. त्यानुसार बुधवारी या दोघांनीही निलंबित करण्यात आले आहे. 'एमएमआरडीए'चे उपमहानगर आयुक्त (प्रशासन) दिलीप कवठकर यांनी या दोघांना निलंबित केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा