चित्रपट प्रदर्शित करण्याच्या नावाखाली निर्मात्याला सव्वा कोटीचा गंडा

रिझवी यांना राजेशने दहा लाख रुपयांची फी, इतर प्रसिद्धीसाठी येणारा खर्च असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा तपशील दिला होता. त्यात चित्रपटाची जाहिरात, पोस्टर्स, मॅगझीन प्रिटींग, प्रमोशन, पोस्ट रिलीज, पब्लिसिटी, मार्केटिंग, डिजिटल सर्व्हिस आणि लेबर चार्जेस आदींचा समावेश होता.

चित्रपट प्रदर्शित करण्याच्या नावाखाली निर्मात्याला सव्वा कोटीचा गंडा
SHARES

मुंबईसह देशातील ५००  चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करून १० कोटी रुपयांचा गल्ला जमवून देण्याचं आश्वासन देऊन उत्तर प्रदेशच्या एका निर्मात्याची सव्वा कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या प्राॅपर्टी सेलने गुरूवारी त्रिलोकचंद माणिकलाल कोठारी आणि राजेश देवविलास सिंह या दोघांना अटक केली आहे. यातील त्रिलोकचंद्र हा कापड व्यापारी, तर राजेश हा व्यापारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.


राम की जन्मभूमी

उत्तर प्रदेशच्या लखनऊचे रहिवाशी असलेले सय्यद वसीम रिझवी हे चित्रपट निर्माता असून त्यांनी अलीकडेच ‘राम की जन्मभूमी’ नावाच्या एका चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात विवेक अग्रवाल हे सहनिर्माता असून चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन आणि डबिंगचे काम अपूर्ण असल्याने ते दोघेही मार्च महिन्यात मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांची ओळख त्रिलोकचंद यांच्याशी झाली.


प्रदर्शनाबाबत करारनामा

यावेळी त्रिलोकचंदने त्याचा मित्र राजेशची सागर प्रॉडक्शन नावाची कंपनी असून ही कंपनी चित्रपटाच्या वितरणाचं काम पाहत असल्याचं दोघांना सांगितलं. त्याच्याकडे प्रदर्शनाचं काम दिल्यास तो भारतातील ५०० चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करून १० कोटी रुपयांचा गल्ला जमवून देईल असं सांगितलं. त्यानुसार तक्रारदारांनी त्यांच्यावर प्रदर्शनाची जबाबदारी सोपवली.  चित्रपटाच्या प्रसिद्धीसह प्रदर्शनाबाबत एक करारनामा करण्यात आला होता. 


सव्वा कोटी दिले

 रिझवी यांना राजेशने दहा लाख रुपयांची फी, इतर प्रसिद्धीसाठी येणारा खर्च असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा तपशील दिला होता. त्यात चित्रपटाची जाहिरात, पोस्टर्स, मॅगझीन प्रिटींग, प्रमोशन, पोस्ट रिलीज, पब्लिसिटी, मार्केटिंग, डिजिटल सर्व्हिस आणि लेबर चार्जेस आदींचा समावेश होता. तसंच हा चित्रपट कुठल्या राज्यात, किती सिनेमागृहात प्रदर्शित केला जाईल, चित्रपटाचे किती शो दाखविले जातील, रोजच्या कलेक्शनबाबतची माहिती सविस्तर माहिती देण्यात येईल असं सांगितलं. करारानुसार त्यांनी या दोघांनाही टप्याटप्याने सुमारे सव्वा कोटी रुपये दिले. 


चित्रपट फ्लॉपचा बनाव

  चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रिझवी आणि अग्रवाल यांना करारानुसार नफा मिळाला नाही.  याबाबत त्यांनी दोन्ही आरोपी त्रिलोकचंद आणि राजेश यांच्याकडं विचारणा केली असता, आम्हाला भाई लोकांकडून धमक्या आल्या असून त्यांनी हा चित्रपट कुठल्याही सिनेमागृहात प्रदर्शित होऊ दिला नाही. त्यामुळे हा चित्रपट फारसा चालला नाही. तो फ्लॉप झाला, असं त्यांनी सांगितलं.  हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटल्याने रिझवी आणि अग्रवाल यांनी शहानिशा सुरु केली असता त्रिलोकचंद आणि राजेशने चित्रपटाच्या प्रसिद्धीसह प्रदर्शनासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याचं उघडकीस आलं. 


पोलिस कोठडी

त्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पुढे प्राॅपर्टी सेलकडे दिल्यानंतर पोलिसांनी त्रिलोकचंद माणिकलाल कोठारी आणि राजेश देवविलास सिंह या दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 



हेही वाचा -

बेपत्ता आई-वडिलांच्या शोधसाठी मुलीचा टाहो, पोलिसही लागले कामाला

लकडावाला बनावट फसवणूक प्रकरणात आणखी एकाला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा