पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी छोटा राजनसह ९ दोषींना जन्मठेप


पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी छोटा राजनसह ९ दोषींना जन्मठेप
SHARES

मिड डे या इंग्रजी वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतीराम डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डाॅन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनसह ९ जणांना मकोका न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आरोपींपैकी एकाचा खटला सुरू असताना मृत्यू झाला असून नयन सिंह बिष्ठ हा आरोपी अद्याप फरार आहे. तर या प्रकरणातील आरोपी असलेल्या पॉल्सन जोसेफ आणि पत्रकार जिग्ना वोरा यांची पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.


१२ जणांना अटक

११ जून २०११ रोजी भरदिवसा जे. डे. यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी सीबीआयने छोटा राजनसह पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश आगनावे, विनोद आसरानी, पॉलसन जोसेफ, दीपक सिसोदियासह एकूण १२ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध जे. डे. यांच्या हत्येचा कट रचून प्रत्यक्ष हत्या करणे, मोक्का तसेच शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याखाली खटला भरला होता. त्यापैकी विनोद असरानी हा खटला सुरू असताना मरण पावल्याने फक्त ११ आरोपींविरुद्ध प्रत्यक्ष खटला चालवण्यात आला. 


एकूण १५५ साक्षीदार

जे. डे. यांच्या हत्येसंदर्भात माहिती देण्यासाठी छोटा राजन याने अनेक पत्रकारांना दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. हे दूरध्वनी संभाषण टेप करण्यात आलं असून तो पुराव्याचाच एक भाग आहे. त्यामुळे ज्या-ज्या पत्रकारांनी त्यावेळी छोटा राजनशी दूरध्वनी वरून चर्चा केली त्या सर्व पत्रकारांची या खटल्यात साक्ष घेण्यात आली. या पत्रकारांसह या प्रकरणात एकूण १५५ साक्षीदार तपासण्यात आले.

या खटल्यात एकूण १३ जणांवर आरोप करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे. तर पॉल्सन जोसेफ आणि पत्रकार जिग्ना वोरा यांनी पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा