मुंबईत वाहन चोरांचा सुळसुळाट


मुंबईत वाहन चोरांचा सुळसुळाट
SHARES

तुमच्या वाहनांची काळजी आता तुम्हीच घेतलेली बरी. कारण, मुंबईत वाढत्या वाहनांची चोरी थांबवण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही मुंबईत वाहन चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. देशात वाहन चोरीमध्ये उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत असला, तरी मुंबईत हे प्रमाण लक्षणीय आहे.


२०१६-१७ मध्ये इतक्या गाड्या चोरीला

मुंबईत दररोज तीन ते चार वाहनांची चोरी होते आणि आठवड्यातून एखादं वाहन सापडतं. त्यातच दुचाकी चोरींचे प्रमाण सर्वाधिक आहे. पाजेरो, तवेरा, स्कॉर्पिओ आदी चोरीची वाहने सध्या नेपाळ, भूतानमध्ये नेऊन विकली जात आहेत. ही चोरीची वाहने परत आणणे पोलिसांसमोरील आव्हान बनले आहे. मुंबईतील वाहन चोरीची माहिती सामाजिक कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांनी माहितीच्या आधाराखाली मागवली असता. मुंबईत २०१६ मध्ये तब्बल ३११८ गाड्या चोरीला गेल्याची नोंद असून त्यातील ८६१ गाड्या शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर २०१७ मध्ये वाहन चोरीचं प्रमाण काही प्रमाणात कमी असलं तरी वर्षभरात ३०१२ गाड्या चोरीला गेल्याची नोंद आहे. तर यातील ९३५ गाड्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं असल्याचं म्हटले आहे.


तरीही होते चोरी

पूर्वी वाहनांच्या चोऱ्या प्रामुख्याने पहाटे तीन ते पाचमध्ये व्हायच्या. मात्र आता दिवसा ढवळ्या दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची चोरी होत आहे. अनेक ठिकाणी वाहनचोरी सीसीटीव्ही यंत्रणेत चित्रबद्ध होऊनही पोलिस या वाहनांचा शोध घेण्यात अपयशी ठरले आहेत. या शोधासाठी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र पथक आहे. या पथकाने काही टोळ्याही पकडल्या आहेत. तरीही चोरीचे प्रमाण घटलेलं नाही.


वाहन चोरीच्या घटनांना लगाम लावा

अनेक महागड्या गाड्यांना सध्या अत्याधुनिक यंत्रणा असल्यामुळे या गाड्यांच्या चोरींची संख्या कमी आहे. गाडी कितीही सुरक्षित केली तरी ती चोरली जात असल्याचा अनुभवही काहीजणांना येत आहे. गाडीत अत्यंत संरक्षक यंत्रणा असूनही चोरी कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळेच या वाहन चोरीच्या घटनांना लगाम लावण्यासाठी पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ठोस पावले उचलायला हवं, असं सामाजिक कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा