कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे?, जाणून घ्या

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांची पहिली पोस्टिंग होती. १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते.

कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे?, जाणून घ्या
SHARES

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होणारे हेमंत नगराळे यांची आजपर्यंतची कारकीर्द पाहूया.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आलेले हेमंत नगराळे हे देखील डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रवतीचे आहेत. भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले आहे. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. १९८७ च्या बॅचचे ते पोलीस अधिकारी आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांची पहिली पोस्टिंग होती. १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते.  रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना १९९४ ते १९९६ या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं होतं. १९९६ ते १९९८ मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती. 

२०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी तेथील बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या दरोड्याची देशभर चर्चा झाली होती. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला.

१९९८ ते २००२ या चार वर्षांच्या काळात नगराळे यांनी सीबीआयचे एसपी आणि नंतर डीआयजी म्हणून काम पाहिलं आहे. याच काळात त्यांनी १३० कोटींचा आर्थिक घोटाळा झालेले प्रसिद्ध केतन पारेख प्रकरण, ४०० कोटींचा हर्षद मेहता घोटाळा आणि तब्बल १८०० कोटींच्या माधोपुरा कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याचा तपास केला आहे.

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी हेमंत नगराळे हे MSEDCL चे स्पेशल इन्स्पेक्टर जनरल होते. हल्ल्यावेळी नगराळे हॉटेल ताजमध्ये शिरले आणि त्यांनी जखमी आणि मृतांना बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडली.यानंतर त्यांनी ताजमध्ये ठेवण्यात आलेली आरडीएक्स ने भरलेली बॅग स्वत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी ठेवली आणि नंतर बॉम्ब स्क्वॉडला पाचारण केलं.

हेमंत नगराळे यांनी याआधी २०१४ मध्ये काही काळासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये ते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त देखील राहिले आहेत. ७ जानेवारी २०२१ रोजी नगराळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली होती.



हेही वाचा -

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा