या प्रथितयश अभिनेत्रींनी का केली आत्महत्या?


या प्रथितयश अभिनेत्रींनी का केली आत्महत्या?
SHARES

मुंबई म्हणजे फॅशनची कर्मभूमीच. त्यामुळे फॅशन क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी देशभरातून अनेक मुलं-मुली मुंबईत येतात. झगमगत्या रॅम्पवर वॉक करणे, मोठ्या मोठ्या जाहिराती करणे याकडे अनेक मुली आकर्षित होतात. झगमगत्या रॅम्पपर्यंतचा पल्ला गाठणे हे तितके सोपे नसते. या प्रवासात अनेक चांगले-वाईट अनुभवही येतात. बॉलिवुडमधल्या अनेक चित्रपटांमध्येही हा विषय हाताळला गेला आहे. 'फॅशन', 'कॅलेंडर गर्ल' या चित्रपटांमधून ग्लॅमर क्षेत्राचं वास्तव मांडण्यात आलं आहे. 'जिस्मों का है ये जलवा, किसमो का है ये जलबा, शोहरत भी दे ये जलवा' हे फॅशन चित्रपटातील गाणं खरंच या क्षेत्रातील वास्तव अत्यंत वास्तवदर्शीपणे प्रेक्षकांसमोर मांडतं. ग्लॅमर क्षेत्र कमी वेळेत प्रसिद्धी आणि भरमसाट पैसा देतं. पण या बदल्यात खूप काही वसूल केलं जातं असाच अनेकांचा आजवरचा अनुभव आहे.

ग्लॅमर क्षेत्रातलं हे वलय कायम टिकवण्यासाठी लोकांना सततची धडपड करावी लागते. अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण एवढं करुनही सर्वांच्याच वाट्याला यश येतंच असं नाही. काहींच्या वाट्याला निराशा येते. त्यातूनच व्यासनाधिनता, लैंगिक शोषण अशा घटना घडतात. काही जण टोकाचा निर्णय घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मॉडेल्सने आत्महत्या केल्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातूनच आजपर्यंत अनेक मॉडेल्सनी आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडला आहे.

अंजली श्रीवास्तव (१९ जून २൦१७)

अंजली श्रीवास्तव ही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणारी मॉडेल आणि अभिनेत्री. १९ जून २൦१७ मध्ये तिनं अंधेरीतील राहत्या घरी आत्महत्या केली. तिच्या जवळून कोणती सुसाइड नोटदेखील मिळाली नाही. मात्र ग्लॅमर विश्वाच्या याच भयानक वास्तवाला कंटाळून तिनं आत्महत्या केली असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.   

प्रत्युषा बॅनर्जी (१ एप्रिल २൦१६)

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने १ एप्रिल २०१६ मध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 'बालिका वधू' या मालिकेमुळे प्रत्युषा घरोघरी पोहोचली होती. तिच्या आत्महत्येच्या बातम्या अनेक दिवस माध्यमांमध्ये चर्चिल्या गेल्यानंतर शांत झाल्या. मात्र, तिच्या आत्महत्येसाठी तिचा प्रियकर राहुल राजला जबाबदार धरलं गेलं. 

तसेच आत्महत्येपूर्वी राहुल आणि प्रत्युषा यांच्यातील संभाषणदेखील समोर आलं होतं. राहुल तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. पण राहुलने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून राहुल राज सध्या जामिनावर बाहेर आहे.

शिखा जोशी (१३ मे २൦१५)

मॉडेल आणि अभिनेत्री शिखा जोशीने १३ मे २०१५ मध्ये वर्सोवातल्या राहत्या घरी सुरीने गळा कापून आत्महत्या केली होती. शिखा रक्तबंबाळ अवस्थेत बाथरुममध्ये पडली होती. सर्वात भयानक म्हणजे तिच्या मैत्रिणीने तिचा व्हिडिओ बनवला होता.

पोलिसांनी विचारलं तर आम्ही काय सांगायचं? तू असं का केलंस? असा प्रश्न शिखाची मैत्रिण शिखाला व्हिडिओत विचारत होती. या व्हिडिओमध्ये शिखानं एका डॉक्टरचं नाव घेतलं. डॉक्टर शिखावर अत्याचार करत असल्याचं समोर आलं. त्यामुळे शिखानं आत्महत्या केल्याची चर्चा सुरु होती.

अर्चना पांडे (२९ सप्टेंबर २൦१४)

२९ सप्टेंबर २൦१४ या दिवशी अर्चनाचा मृतदेह वर्सोवा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. घरातून दुर्गंधी येत असल्यानं शेजारच्यांनी रुम मालक आणि पोलिसांना बोलावून घेतलं. दरवाजा उघडताच अर्चनाचा पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटही सापडली. या नोटमध्ये अर्चनानं आपल्या आत्महत्येस प्रियकर जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. अर्चनाचा प्रियकर ओमर आसिफ पठाण याने तिचा विश्वासघात केला. या दोघांचेही प्रेमसंबंध असताना त्याचे अन्य एका तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते. यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यामुळे अर्चनानं आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं पोलिसांनी नंतर स्पष्ट केलं.

अर्चनानं काही दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं होतं. मात्र, त्यावेळी तिच्याकडे काहीच काम नव्हतं. यामुळेही तिला नैराश्य आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी तिच्या आत्महत्येमागे हे देखील कारण असल्याची शक्यता वर्तवली आहे.

जिया खान (३ जून २൦१३)

अभिनेत्री जिया खाननं ३ जून २൦१३ मध्ये जुहूमधील राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तिने ६ पानांचे पत्र लिहून ठेवलं होतं. या पत्रात जियानं तिच्या प्रियकरानं तिला किती त्रास दिला यासंदर्भात लिहिलं होतं. या पत्राच्या आधारे १൦ जूनला सूरज पांचोलीला जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. १ जुलैला सूरजला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. सूरजमुळेच जियाने आत्महत्येचं पाऊल उचललं, असा आरोप जियाची आई रबिया खान यांनी केला आहे. अजूनही या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

जिया खाननं अमिताभ बच्चनसोबत 'नि:शब्द' आणि आमिर खानसोबत 'गजनी' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तसंच 'हाऊस फुल' या चित्रपटातही तिनं छोटीशी भूमिका साकारली होती.

विवेका बाबाजी (२५ जून २൦१൦)

मॉडेल विवेका बाबजीने २५ जून २൦१൦ मध्ये मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ दरवाजा बंद असल्यानं इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना कळवले. दरवाजा तोडून घरात प्रवेश करताच विवेकाचा मृतदेह आढळला. विवेकाच्या डायरीच्या शेवटच्या पानावर 'यू किल्ड मी गौतम व्होरा' असं लिहलं होतं. प्रियकर गौतम व्होरासोबतच्या ब्रेकअपमुळे ती डिप्रेशनमध्ये होती. या डिप्रेशनमुळे विवेकानं आत्महत्या केली. पोलिसांनुसार यापूर्वीही तिनं तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गौतम व्होराच्या अटकेनंतर २൦१२ मध्ये पोलिसांनी ही केस पुन्हा रिओपन करत विवेकाचा मर्डर झाल्याचा दावा केला होता.

विवेकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं होतं. पण कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीमुळे ती चर्चेत आली होती. विवेकाचा जन्म मॉरिशिअसमध्ये झाला होता. मॉडेलिंगच्या निमित्तानं ती भारतात आली होती. तिला १९९३ मध्ये 'मिस मॉरीशिअस' हा पुरस्कार मिळाला होता.

कुलजित रंधावा (८ फेब्रुवारी २൦൦६)

अभिनेत्री आणि मॉडेल कुलजित रंधावानं ८ फेब्रुवारी २൦൦६ रोजी आत्महत्या केली. जुहूच्या राहत्या घरात गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिनं तिचा मित्र भानू उदय याच्या नावानं पत्र लिहिलं होतं. यात तिनं म्हटलं होतं की, 'हा फक्त माझा निर्णय आहे. यासाठी कुणीही जबाबदार नाही. पण आयुष्यात असणारा दबाव मी सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे.'

कुलजितनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्पेशल स्क्वॉड', 'कोहिनूर', 'हिप हिप हुर्रे' या मालिकांमध्ये तिने काम केलं होतं.

नसिफा जोसेफ (२९ जुलै २൦൦४)

करिअर घडवण्यासाठी मुंबईत आलेली मॉडेल नसिफा जोेसेफने २९ जुलै २൦൦४ मध्ये आत्महत्या केली होती. गौतम खंडुजासोबत झालेल्या प्रेमभंगातून तिने वर्सोव्यातल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. बोललं जातं की, लग्नाच्या एक दिवस आधी गौतमनं लग्नास नकार दिला होता. त्यामुळे नैराश्येपोटी तिनं हे पाऊल उचलल्याचा आरोप नसिफाच्या आई-वडिलांनी केला. याविरोधात नसिफाच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार देखील केली. गौतम विरोधात न्यायालयात खटलाही सुरू होता. पण मुंबई उच्च न्यायालयानं जानेवारी २൦൦६ पर्यंत या खटल्यावर स्टे लावला. या प्रकरणी गौतमनं सर्व आरोप फेटाळले. 'समीर मल्होत्रा आणि समीर सोनी यांच्यासोबत नसिफाचा साखरपुडा मोडला होता. त्यामुळे माझ्यामुळे तिनं आत्महत्या केली' असं बोलता येणार नाही, असा दावा गौतमनं न्यायालयात केला होता.

12 वर्षांची असतानाच नसिफानं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. १९९१ मध्ये तिनं 'मिस इंडिया'चा किताब स्वत:च्या नावे केला होता. एमटीव्ही या चॅनेलमध्ये तिनं एका शोचं सूत्रसंचालन केलं होतं. सोनी टीव्हीवर येणाऱ्या 'कॅट' या मालिकेतही तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा