हवाई सुंदरीची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक


हवाई सुंदरीची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
SHARES

मुंबईत नोकरीच्या शोधात असाल तर सावधान! शहरात बेरोजगारांना गंडा घालणारी टोळी कार्यरत असून कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्यात अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. येस मॅन पॉवर नामक एक कंपनी तरूणींना ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात हवाई सुंदरी (एअर होस्टेस)ची नोकरी मिळवून देण्याचे दाखवत होती. मात्र पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने एका तरूणीने या कंपनीच्या मालकाविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. रुक्सार रंगरेज असे या तक्रारदार तरूणीचे नाव असून विश्वास सिंग असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येस मॅन पॉवर कंपनीचा मालक विश्वास सिंग याने रुक्सार रंगरेजला हवाई सुंदरीची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. या मोबदल्यात विश्वास सिंगने रुक्सारकडून ५० हजार रुपये देखील घेतले होते. रुक्सारने त्याला पैसे दिल्यावर हवाई सुंदरीच्या निवडीसाठी मुलाखत केव्हा होणार? अशी विचारणा केली. त्यावर विश्वास सिंगने ही मुलाखत दिल्लीला होणार असून दिल्लीला जाण्यासाठी १० हजार रुपये आणखी लागतील, असे तिला सांगितले. त्यानंतर रुखसारने त्याला ही मुलाखत कोण घेणार? असे विचारल्यावर आपले भाऊ ही मुलाखत घेतील, असे विश्वास सिंगने स्पष्ट केले.

मात्र त्यानंतर अनेकदा विचारणा करूनही विश्वासने तिला दिल्लीला घेऊन जाण्यास टाळाटाळ केली. विश्वासच्या वागण्या-बोलण्यावर शंका आल्याने रुक्सारने त्याला आपल्याच कंपनीत नोकरी देण्याची विनंती केली आणि हळूहळू कंपनीची माहिती मिळवण्यास सुरूवात केली. तेव्हा तिला मोठाच धक्का बसला. आतापर्यंत या बोगस कंपनीने अनेक तरूणींकडून हवाई सुंदरीची नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले होते. परंतु यातील कुणालाच आतापर्यंत नोकरी दिली नव्हती. तसेच बेरोजगार तरूणींकडून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर विश्वास सिंग मौजमजा करत होता.

सरतेशेवटी रुक्सारने आपले पैसे परत मागितल्यावर विश्वासने तिला धमकवण्यास सुरूवात केली. तेव्हा रुक्सारने थेट समता नगर पोलीस ठाणे गाठत विश्वासविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली. याप्रकरणी समता नगर पोलिसांचा तपास सुरू आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा