Advertisement

श्रावण मासी..हर्ष मानसी!


श्रावण मासी..हर्ष मानसी!
SHARES

चातुर्मासातील पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाला 24 जुलैपासून सुरुवात झाली आहे. यंदा श्रावण सोमवारपासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील विविध शिवमंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच रांग लावून महादेवाचे दर्शन घेतले. मुंबईतल्या अनेक शिवमंदिरांतही 'हर हर महादेव'चा जयघोष करत भाविकांनी गर्दी केली होती. 


काय आहे श्रावण?

श्रावण महिना चातुर्मासातील म्हणजेच चार महिन्यांतील श्रेष्ठ आणि पवित्र म्हणून ओळखला जातो. या काळात पावसाच्या सरींमुळे वातावरण आल्हाददायक झालेले असते. श्रावणात पचण्यासाठी जड पदार्थ खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते, असे आहारशास्त्र सांगते. त्यामुळे या दिवसांत व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे. श्रावण सुरू होताच घराघरात मंगळागौर खेळले जातात. 

श्रावणापासून हिंदू धर्मियांच्या सणांच्या हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. श्रावणात येणाऱ्या नागपंचमी या सणाच्या दिवशी नागांची पूजा केली जाते. यासोबत जन्माष्टमी आणि दहिहंडी हा श्रावणातील मोठा उत्सव आहे. याचसोबत श्रावणातल्या नारळी पौर्णिमेला पावसाचा जोर ओसरतो. समुद्रकिनारी राहणारे लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात. तर बहीण-भावाचे नाते दृढ करण्यासाठी हा सण रक्षाबंधन म्हणूनही साजरा केला जातो. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आमावस्येला शेतकरी बैलपोळा साजरा करतात. या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते.


श्रावणी सोमवार असल्याने मुंबईतल्या बाबूलनाथ मंदिर, काण्हेरी लेणी, एलिफंटा लेणी, तुंगारेश्वर मंदिर यासोबतच अंबरनाथमधील शिवमंदिरात भाविकांनी शिवपूजा केली. 


बाबूलनाथ मंदिर  

मुंबईतल्या अनेक शिवमंदिरांपैकी एक असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे बाबूलनाथ. मलबार हिल येथे वसलेल्या या मंदिरात श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती.  


काण्हेरी लेणी

मुंबईतल्या बोरिवली उद्यानाच्या मध्यभागी पुरातन काण्हेरी लेणी आहे. काण्हेरी हा संस्कृत शब्द कृष्णगिरीतून घेतलेला असून त्याचा अर्थ "काळा डोंगर" असा होतो. कान्हेरीच्या 109 गुहा अखंड डोंगरामध्ये आहेत. या गुहेची लांबी 26.36 मीटर असून रुंदी 13.36 मीटर आणि 12.9 मीटर उंचही आहे. श्रावणात भाविक येथे मोठ्या संख्येने येत असतात


एलिफंटा लेणी 

घारापुरी येथील एलिफंटा लेणी आणि त्यावरील शिल्पे इ. स. च्या 9 व्या शतकापासून ते इ. स. च्या 15 व्या शतकापर्यंत कोरली जात होती. पर्यटकांची येथे नेहमी गर्दी असते. श्रावणातदेखील मोठ्या संख्येने शिवभक्त येथे येत असतात.


तुंगारेश्वर मंदिर 

वसईतल्या तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत 2177 फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने आणि प्रसिद्ध आहे. शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमलासुर या राक्षसाने येथे केली, अशी आख्यायिका आहे. या ठिकाणीही शिवभक्त श्रावणात गर्दी करतात.


अंबरनाथमधील शिवमंदिर

अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर हे 955 वर्ष जुने आहे. 1960 मध्ये शिलाहार राजा महामंडलेेशर माम्वानी राजदेव यांच्या कालावधीत श्रावण शुद्ध नवमीला या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. युनेस्कोने जाहीर केलेल्या 218 कलासंपन्न वास्तूंपैकी 25 वास्तू भारतात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथमधील शिवमंदिराचाही समावेश आहे. त्यामुळे श्रावणात भाविक या मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी जरुर येतात.  



हेही वाचा

श्रावणातील स्पेशल रानभाज्या, आरोग्यासाठी फायदेशीर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा