Advertisement

कोरोनामुळे पहिल्यांदाच प्रभादेवीची जत्रा रद्द


कोरोनामुळे पहिल्यांदाच प्रभादेवीची जत्रा रद्द
SHARES

कोरोनामुळं इतिहासात पहिल्यांदाच प्रभादेवीची जत्रा रद्द करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे मुंबईत असलेल्या प्रभादेवी मातेची जत्रा भरते. या जत्रेत मुंबईसह राज्याच्या अनेक भागातील लोक हजेरी लावत असतात. देवीवर असलेली श्रद्धा यामुळं भक्त देवीची ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळं सर्वच रद्द करण्यात आलं आहे.

पिपाण्यांचा आवाज, आकाश पाळण्याचा थरार भल्ली मोठी बंदूक खांद्यावर ठेऊन फुगे फोडण्याचा आनंद, तिखट आंबट अशी चटकदार १२ मसाल्याची चिंच आणि मालवणी खाजा ही सर्व मज्जा या जत्रेत मिळतेे. परंतु यंदा कोरोनामुळं ही मज्जा काही अनुभवता येणार नाही. इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे प्रभादेवीची जत्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ३०६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे.

मुंबईची जीवनशैली बदलली असली तरी देखील या आधुनिक काळात अजूनही काही परंपरा टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे प्रभादेवीची जत्रा. ३०६ वर्षांचा इतिहास असलेल्या या प्रभादेवीच्या मंदिरातील जत्रा म्हणजे एक पर्वणी असते. दरवर्षी पौष महिन्यात वार्षिक जत्रा उत्सव आयोजित केला जातो.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवीच्या मातेचा जत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी अशी कोणतीही आपत्ती आली नव्हती. ज्यामुळे जत्राउत्सव खंडित करावा लागला आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे यंदाचा जत्रोत्सव खंडित होणार आहे. त्यामुळे यंदा पाळण्यात बसण्याचा आनंद आणि पिपाण्याचा आवाज काही अनुभवता येणार नाही.

प्रभादेवीचा जत्राउत्सव येत्या पौष पौर्णिमेला गुरुवारी २८ जानेवारी ते ०६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या उत्सवाच्या दिवसांतसुद्धा मंदिर फक्त दर्शनासाठी उघडे राहणार आहे. तसेच दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत राहील. त्याचप्रमाणे मास्क लावल्याशिवाय मंदिराच्या आवारात प्रवेश करु नये. त्याचप्रमाणे दर्शन घेताना योग्य तेवढे अंतर राखावे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी साडी, ओटी, हार, फुले, वेणी, नारळ, फळे आणि मिठाई इत्यादी कोणतीही वस्तू अर्पण करण्यासाठी आणू नये. त्याचप्रमाणे लहान मुलांना मंदिरात आणण्यास बंदी असून कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा