Advertisement

शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश

कोरोना काळात आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला काही शाळा नाकारत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडं आल्या आहेत.

शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश
SHARES

शाळा सोडल्याचा दाखला (school leaving certificate) नसला तरीही आता विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश (school  admission) मिळणार आहे. या संदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयही काढण्यात आला आहे. 

कोरोना काळात आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला काही शाळा नाकारत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडं आल्या आहेत. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक नसेल असा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर आता शाळा सोडल्याचा दाखला (school leaving certificate) किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट (Transfer certificate) नसेल तरी प्रवेश मिळणार आहे.

याबाबतच्या शासन निर्णयात म्हटलं आहे की, काही कारणांमुळे (आर्थिक अडचणीमुळे किंवा फी न भरल्यामुळे) एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळेतून टी.सी. म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच एलसी देण्यात आला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानीत माध्यमिक शाळेत सदर दाखल्या अभावी प्रवेश देण्यात येत नसल्याचं समोर आलं आहे.

या सर्वांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. आरटीई अधिनियमातील कलम ५ मधील (२) व (३) नुसार विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा हक्क असेल. साधारण परिस्थितीमध्ये दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळेतील शाळा प्रमुख तात्काळ ट्रान्सफर सर्टिफिकेट देतात. काही कारणांमुळे असे प्रमाणपत्र मिळवण्यास उशीर होत असेल किंवा सदर दाखला नाकारला जात असेल तर दुसऱ्या शाळेत (शासकीय किंवा अनुदानित) प्रवेश देण्यात उशीर करणे अथवा प्रवेश नाकारणे अन्यायकारक ठरेल. माध्यमिक शाळा संहितेतील कलम १८ नुसार एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याच्या बाबतीत ही तरतूद स्पष्ट करण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा शाळा सोडल्याचा अथवा बदलल्याचा दाखला उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला असल्याचेही या निर्णयात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा अथवा बदलल्याच्या दाखल्या अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.

पूर्वीच्या शाळेकडून शाळा सोडल्याचा अथवा बदलल्याचा दाखला प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश द्यावा. यासाठी विद्यार्थ्यांचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, असंही शासन निर्णयात म्हटलं आहे. हेही वाचा - 

CBSE 10th result: सीबीएसई दहावीचा निकाल २० जुलैला लागणार

  1. CBSE १२ वी निकालाचा 'असा' आहे फॉर्म्युला, निकाल ३१ जुलैपर्यंत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा