Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या विकासाचं ब्ल्यू प्रिंट २ पानांत कसं शक्य? माजी सिनेट सदस्याचा सवाल


मुंबई विद्यापीठाच्या विकासाचं ब्ल्यू प्रिंट २ पानांत कसं शक्य? माजी सिनेट सदस्याचा सवाल
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडून नुकतीच एक जाहिरात काढण्यात अाली. या जाहिरातीला प्रतिसाद देत जे पात्र उमेदवार मुलाखतीसाठी येतील, ते या पदासाठी कसे योग्य उमेदवार आहेत, याच समर्थन त्यांना करायचं आहे. सोबतच मुंबई विद्यापीठाचा विकास कसा करता येईल? विद्यापीठापुढील आव्हाने काय आहेत? ती कशी स्वीकारता येतील, यासंदर्भातील ब्ल्यू प्रिंट समितीपुढे सादर करावी लागणार आहे. विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी संबंधित उमेदवाराची दूरदृष्टी तपासणं हा या मागचा समितीचा उद्देश असला, तरी आपलं म्हणणं मांडण्यासाठी समितीने उमेदवारांना केवळ दोन पानांमध्येच सर्व तपशील देण्याचं बंधन घातलं आहे. याला काही माजी सिनेट सदस्य आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.


विद्यापीठाचा आवाका लक्षात घ्या

सद्यस्थितीत मुंबई विद्यापीठाचं कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग अशा ६ जिल्ह्यात विस्तारलं आहे. ७७० महाविद्यालयाचा कारभार आणि त्यासोबतच विद्यापीठाचे ५४ विभाग, ५ स्वायत्त विभाग, एक घटक, २ आदर्श आणि ४ समुदाय महाविद्यालये आहेत. त्यात सुमारे ७ लाखांच्या आसपास विद्यार्थी विविध अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहेत.

विद्यापीठाचा आवाका एवढा मोठा असताना उमेदवार केवळ दोन पानांमध्ये ब्ल्यू प्रिंट कशी सादर करू शकतील? दोन पानांऐवजी चार पानं झाली तर काय हरकत आहे? असा प्रश्न माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी उपस्थित केला. या उलट मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून विद्यापीठाचा आवाका लक्षात घेऊन गुणवत्ता आणि विकासावर आधारीत तपशीलवार आराखडा घ्यावा, अशी मागणीही तांबोळी यांनी केली.


१४ फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत

राज्यातील अकृषी विद्यापीठात कुलगुरूंची नियुक्ती करण्यासाठी २९ मे २००९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. माजी वादग्रस्त कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर सरकारने नवीन कुलगुरूंच्या शोधासाठी त्रिसदस्यीय शोध समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन आहेत. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी उत्तराखंडचे संचालक डॉ. श्याम लाल सोनी आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी समिती सदस्य आहेत. नवीन कुलगुरूसाठी शोध समितीने दिलेल्या जाहिरातीनुसार १४ फेब्रुवारीपर्यंत समितीकडे अर्ज करावा लागणार आहेत.



हेही वाचा-

कुणी कुलगुरू देतं का कुलगुरू... विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा