Advertisement

अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, मराठा विद्यार्थ्यांना करता येईल नव्याने अर्ज

चालू शैक्षणिक वर्षातील (२०१९-२०) अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात येणार असून त्यासंदर्भातील नवं वेळापत्रक लवकरच राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधिमंडळात दिली.

अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, मराठा विद्यार्थ्यांना करता येईल नव्याने अर्ज
SHARES

चालू शैक्षणिक वर्षातील (२०१९-२०) अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात येणार असून त्यासंदर्भातील नवं वेळापत्रक लवकरच राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधिमंडळात दिली. या प्रवेश प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातून (ओपन कॅटॅगिरी)तून आॅनलाईन अर्ज भरलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्ग) आणि ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) वर्गातून नव्याने अर्ज करता येतील, अशी माहिती देखील शेलार यांनी दिली.

आरक्षण१२ टक्क्यांवर

सध्याच्या शासननिर्णयानुसार अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी एसईबीसी प्रवर्गासाठी १६ टक्के, तर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवताना शैक्षणिक आरक्षणाची मर्यादा १२ टक्के ठेवण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.  

खुल्या प्रवर्गातून अर्ज

शेलार यांनी विधिमंडळात मुख्यमंत्र्यांचं निवेदन वाचून दाखवताना, एसईबीसी आणि ईडब्लूएस (आर्थिकदृष्ट्या मागास) घटकांतील बहुतांश विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज केल्याची माहिती दिली. त्यामुळे राखीव प्रवर्गातील बहुतांश जागा रिक्त असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

जागा शिल्लक

एसईबीसी प्रवर्गा अंतर्गत अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात ३४२५१ राखीव जागा आहेत. परंतु या जागेसाठी केवळ ४५५७ अर्ज आले आहेत. तर ईडब्लूएस प्रवर्गासाठी २८६३६ रिक्त जागांसाठी राज्यभरातून केवळ २६०० अर्ज मिळाल्याची माहिती शेलार यांनी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक असल्याने मराठा विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सबंधित प्रवर्गातून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या मुदतवाढीनुसार अकरावी आॅनलाईन प्रवेशाचं नवीन वेळापत्रक लवकरच शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असंही ते म्हणाले.  

जातपडताळणीची गरज नाही

याचसोबत जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखल जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३ महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. त्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्राऐवजी विद्यार्थ्यांना वडिलांच्या स्वाक्षरीचं हमीपत्र द्यावं लागणार आहे, अशी माहितीही शेलार यांनी दिली.हेही वाचा-

‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’साठी ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

मराठा विद्यार्थ्यांना जात पडताळणीविना प्रवेश – विनोद तावडे


Read this story in English
संबंधित विषय