एकाच शाळेतले सगळे विद्यार्थी १२वीत नापास!

  Vikhroli
  एकाच शाळेतले सगळे विद्यार्थी १२वीत नापास!
  मुंबई  -  

  नुकताचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र मुंबईतील विक्रोळीमध्ये एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. विक्रोळीतल्या महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचे विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास झाले आहेत. महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील सर्वच्या सर्व म्हणजे 17 विद्यार्थी नापास झाले आहे. विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी पर्यावरण (इव्हीएस) या एकाच विषयात नापास झाले आहेत. या सगळ्याला महाविद्यालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आता पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.

  कॉलेज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच प्राध्यापकांची बदली करण्याता आली. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात पाठवणार असल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितले. पण 3 महिने उलटल्यानंतरही तसे काहीच झाले नाही. तोपर्यंत अभ्यासक्रमही पुढे निघून गेला. मध्येच दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश कसे मिळाले असते. याची दक्षताही कोणी घेतली नाही. पैसे नसतानाही पाल्याला महाविद्यालयात टाकले. पण ही परिस्थिती कुणाला सांगायची?

  - आत्माराम ढिगे, पालक

  महालक्ष्मी विद्यामंदिर महाविद्यालयाने विज्ञान शाखेतील सर्वच विद्यार्थ्यांना ईव्हीएस विषयात नापास केले. महाविद्यालयात शिकवण्यासाठी कोणत्याच विषयाचे प्राध्यापक नव्हते. प्राध्यापक नेमण्याचे आश्वासन देऊन देखील महाविद्यालयाने ते पूर्ण केले नाही.

  - मनिष चौबे, विद्यार्थी

  महाविद्यालयाने आमच्याकडून संपूर्ण वर्षाची फी घेतली. शेवटचे दोन महिने असताना महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सांगितले. ते कसे शक्य आहे? पण आम्ही दबाव टाकल्यानंतर संदेश महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची परीक्षा घेण्यात आली. कॉलेजची संपूर्ण फी भरली आणि आता विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना ईव्हीएस या एकाच विषयात नापास केले जाते. ही कुणाची चूक आहे? संपूर्ण उत्तर पत्रिका तपासल्या गेल्या की नाही हा मोठा प्रश्न आहे. आमच्या मुलांचे नुकसान झाले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभे असूनही मुख्याध्यापक आणि प्राध्यापकांचा पत्ता नाही. या महाविद्यालयावर कारवाई झाली पाहिजे. याबद्दल मुंबई विद्यापीठाकडे तक्रार करणार.

  - रिझवाना खान, पालक

  शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांची नेमणूकच केली नाही. संपूर्ण वर्षभर एकाही विषयाचे शिक्षक शिकवण्यासाठी उपलब्ध नव्हते. ईव्हीएस विषयाला प्रॅक्टिकलचे 20 गुण मिळाले पण बाकीचे 30 गुण महाविद्यालयाने दिलेच नाहीत.

  - वैभव ढिगे, विद्यार्थी

  या महाविद्यालयात तास घेण्यासाठी फक्त दोन ते तीन प्राध्यापक असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कुठलाच अभ्यासक्रम पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे 15,000 ते 20,000 रुपये खर्चून पालकांना आपल्या मुलांसाठी खासगी शिकवणी लावावी लागली. परंतु ढिसाळ व्यवस्थापनामुळे आपल्या मुलांचे भवितव्य दावणीला लागल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे.

  याबाबत शाळा प्रशासनाशी 'मुंबई लाइव्ह'ने बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले.


  हे देखील वाचा - 

  दहिसरच्या युनिव्हर्सल स्कूलवर शिवसैनिकांचा मोर्चा

  युनिव्हर्सल शाळेची दादागिरी, 28 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.