दहिसरच्या युनिव्हर्सल स्कूलवर शिवसैनिकांचा मोर्चा

 Dahisar East
दहिसरच्या युनिव्हर्सल स्कूलवर शिवसैनिकांचा मोर्चा
Dahisar East, Mumbai  -  

दहिसर पूर्वेकडील युनिव्हर्सल स्कूलच्या व्यवस्थापनाने 70 विद्यार्थ्यांना वाढीव फी न भरल्यामुळे शाळेतून काढण्याची नोटीस दिली आहे. शाळेच्या या मनमानीचा विरोध करण्यासाठी बुधवारी शिवसैनिकांनी शाळेवर मोर्चा काढला. तसेच 'विद्यार्थ्यांना शाळेतून काढू नये' या आशयाचे निवेदन शाळा व्यवस्थापनाला दिले आहे.

युनिव्हर्सल स्कूलच्या 140 विद्यार्थ्यांचे पालक मागील चार महिन्यांपासून फी वाढीविरोधात शाळा व्यवस्थापनासोबत लढत आहेत. याच दरम्यान शाळा व्यवस्थापनाने वाढीव फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याची नोटीस बजावली आहे. शाळेच्या या मनमानीविरोधात शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी शाळेवर मोर्चा काढला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची भेट घेत विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा घेण्याची विनंती केली. यावर शाळा व्यवस्थापनानेे पुनर्विचार करण्याचे मान्य केले आहे.

आमच्या विनंतीनंतरही शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना पुन्हा घेतले नाही, तर व्यवस्थापनाला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल. एकाही विद्यार्थ्याला शाळेबाहेर जाऊ दिले जाणार नाही. 

- आ. प्रकाश सुर्वे, शिवसेना

युनिर्व्हसल हायस्कूलच्या व्यवस्थापनाने फी वाढीवरून एका विद्यार्थ्याला जरी शाळेतून काढून टाकले, तर शाळेची एनओसी काढून घेण्यात येईल.शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला तशी नोटीसही बजाविली आहे. युनिर्व्हसल हायस्कूलच्या फी वाढीसंदर्भात गुरुवारी 1 जून रोजी राज्य शुल्क नियंत्रण समिती समोर दुपारी 12.30 सुनावणी होणार आहे.
- विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

Loading Comments