Advertisement

युनिव्हर्सल शाळेची दादागिरी, 28 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले


युनिव्हर्सल शाळेची दादागिरी, 28 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले
SHARES

गेले काही दिवस फी वाढीचा मुद्दा गाजत असतानाच दहिसरच्या युनिव्हर्सल शाळेने तब्बल 28 विद्यार्थ्यांना वाढीव फी भरली नाही म्हणून शाळेतून काढून टाकण्याचा प्रताप केला आहे. तसेच, पालकांकडून तब्बल 70 ते 80 विद्यार्थ्यांना नोटिसा आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, 'मुंबई लाइव्ह'ने याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना संपर्क केला असता, त्यांनी युनिव्हर्सल हायस्कूलच्या व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांवर फी भरण्याची सक्ती करू नये, अशा सूचना दिल्याचे सांगितले आहे.

वारंवार सांगूनही पालकांनी शाळेची फी भरली नाही, तसेच शाळेच्या कोणत्याही नोटिशीला पालकांनी उत्तर दिले नाही, म्हणून शाळेकडून 70 ते 80 विद्यार्थ्यांना कमी करण्यात आल्याचे शाळेकडून जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे. तसेच, शाळेची फी पालकांबरोबरच्या मीटिंगमध्येच ठरवण्यात आली होती, परंतु पालकांनी त्यानंतरही फी न भरल्याने या विद्यार्थ्यांवर शाळेच्या रजिस्टरमधून नाव कमी करण्याची कारवाई करणे भाग पडल्याचेही शाळेने नोटिशीत नमूद केले आहे.

मात्र, पालकांनी शाळेचा हा दावा चुकीचा असल्याचे 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले. तसेच, शाळेकडून आलेली नोटीस चुकीची असून, आम्ही शाळेची फी जुन्या स्ट्रक्चरनुसार भरली असून, वाढीव फी भरली नसल्याचा दावा त्यांनी केला.

अचानक आलेल्या नोटिशीमुळे आम्हाला धक्का बसला. माझी दोन्ही मुले याच शाळेत शिकतात. आम्ही एप्रिल आणि मे महिन्याच्या फीचा (जुन्या स्ट्रक्चरनुसार) चेक शाळेला दिला होता. मात्र, शाळेने आमचे चेक परत पाठवले आणि मुलांना शाळेतून काढून टाकले.
सुमन शेट्टी, पालक

जर सरकारने युनिव्हर्सल शाळेवर कारवाई केली नाही, तर इतर शाळाही युनिव्हर्सल शाळेचे अनुकरण करतील. विविध शाळा फीच्या नावाखाली पालकांची आधीच लूट करत आहेत. हे कुठेतरी आता थांबले पाहिजे.
जयंत जैन, संचालक, फोरम फॉर एज्युकेशन


युनिव्हर्सल हायस्कूलच्या व्यवस्थापनाने फी भरण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये - तावडे

ज्या 28 विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही आणि व्यवस्थापनाने त्यांना 31 मे 2017 पर्यंत फी भरण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे, अशा विद्यार्थ्यांची फी सक्तीने घेऊ नये, असे शाळा व्यवस्थापनाला शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा