Advertisement

फ्लॅशबॅक २०१८- विद्यापीठाचं गतवैभव परत मिळणार का?

परीक्षांपासून ते वेळापत्रकांपर्यंत, तारखांपासून ते निकालापर्यंत विद्यापीठात अनेक गोंधळ आजही समोर येत आहेत. असं असताना विद्यापीठात कुलगुरूपदावर नव्यानेच रुजू झालेले रूईयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर विद्यापीठातील गोंधळ कमी करून विद्यापीठाचं गतवैभव पुन्हा मिळवून देणार का ? याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

फ्लॅशबॅक २०१८- विद्यापीठाचं गतवैभव परत मिळणार का?
SHARES

मुंबई विद्यापीठ म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो विद्यापीठाचा गोंधळ आणि गोलमाल कारभार...याच गोलमाल कारभारामुळं विद्यापीठाला मागच्या काही महिन्यांपासून नको तितकी नामुश्की सहन करावी लागत आहे. परीक्षांपासून ते वेळापत्रकांपर्यंत, तारखांपासून ते निकालापर्यंत विद्यापीठात अनेक गोंधळ आजही समोर येत आहेत. असं असताना विद्यापीठात कुलगुरूपदावर नव्यानेच रुजू झालेले रूईयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर विद्यापीठातील गोंधळ कमी करून विद्यापीठाचं गतवैभव पुन्हा मिळवून देणार का ? याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.


उच्च शिक्षणावर पाणी

२०१७ साली विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या कार्यकाळात ऑनलाईन निकाल व पेपर तपासणीदरम्यान बरेच गोंधळ समोर आले. आणि त्यादरम्यान विद्यापीठाची पत घसरण्यास सुरूवात झाली. त्यानंतर घडलेला सर्व गोंधळ निस्तरण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला. त्यानंतर उशीरा का होईना कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांनी रखडलेले निकाल लावत विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ताण हलका केला. परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणावर पाणी सोडावं लागलं.


पूर्णवेळ कुलगुरूची मागणी

त्यानंतर विद्यापीठात या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं सर्व विद्यार्थी संघटनांकडून मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नेमावा, अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर विद्यापीठात कुलगुरूपदासाठी जाहिरात देण्यात आली. विद्यापीठाच्या या जाहिरातीनंतर अनेकांनी यासाठी अर्ज दाखल केले आणि अखेरीस २७ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुहास पेडणेकरांची वर्णी लागली.


सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

परंतु त्यानंतर १० ऑगस्ट २०१८ मुंबई विद्यापीठात कलिना कॅम्पसमधील रानडे भवनमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला. यानंतर तिनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता विद्यापीठातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. विशेष म्हणजे याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची सुरक्षाही वाऱ्यावर सोडण्यात आल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर तात्काळ विद्यापीठ प्रशासनातर्फे ३०० सीसीटीव्हीची घोषणा करण्यात आली, मात्र आतापर्यंत कलिना कॅम्पसमध्ये एकही सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही.


गैरव्यवहारांना आळा

त्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून जुन्या उत्तरपत्रिकेत बदल करून नवीन उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना दिला आहे. या रकान्यामुळं परीक्षा केंद्रापासून ते उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगपर्यंतच्या मार्गात सदर प्रक्रियेमुळे उत्तरपत्रिकेची छेडछाड होऊ शकते. त्याशिवाय उत्तरपत्रिका कोणत्या विद्यार्थ्याची आहे, हे परीक्षा केंद्रात व कॉलेजमध्ये समजणार असल्यास यामध्ये गैरप्रकार होऊ शकतात. ही बाब युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला लक्षात आणून दिली होती. यावर विद्यापीठ प्रशासनाद्वारे उपाययोजना करणार असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं.


परीक्षांचा वाढता ताण

त्याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागावर वाढता परीक्षांचा ताण कमी करण्याकरिता विद्यापीठाने 'लॉ' शाखेच्या ८ परीक्षा कॉलेजांमार्फत घेण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु कॉलेजांमार्फत परीक्षा घेण्यास स्टुडंट 'लॉ' कॉऊन्सिलंद्वारे विरोध करण्यात येत आहे. त्याशिवाय यंदाच्या वर्षी ला अभ्यासक्रमाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून ६०/४० हा नवा पॅटर्न सुरू केला होता.


पॅटर्नला विरोध

या पॅटर्नला विद्यार्थी संघटना कडाडून विरोध करत असताना विद्यापीठ प्रशासन यावर ठाम असल्यानं याविरोधात स्टुंडट लॉ कॉऊन्सिलनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान विद्यापीठ चालवण्यास जमत नसेल तर विद्यापीठाला टाळं लावा असे बोल विद्यापीठ प्रशासनाला सुनवण्यात आले होते. त्याशिवाय या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायलयानं लॉ अभ्यासक्रमाच्या ६०:४० या नव्या पॅटर्नला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.


विद्यार्थी चुकून नापास

यंदाच्या वर्षातील हे सर्व धक्कादायक प्रकार कमी की काय म्हणून विद्यापीठाच्या पूनर्मुल्यांकनात विविध शाखांतील तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केल्याचा धक्कादायक बाब समोर आली. त्याशिवाय जागतिक क्रमवारीत विद्यापीठाच टॉप ५०० मध्ये नाव नसणं, नॅक रँकिंगमध्ये विद्यापीठाची घसरण यांसारख्या एक ना अनेक गोंधळासाठी मुंबई विद्यापीठ प्रसिद्ध आहे.


निकाल १०० टक्के

मात्र या दरम्यानं विद्यापीठानं गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकाल वेळेत लावण्यात १०० टक्के मिळाले असून विद्यापीठाची रजिस्ट्रार, प्र-कुलगुरू यांसारखी रिक्त पदांची भरती करण्यात आली. त्याशिवाय नुकतंच क्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांक मिळवला होता. विशेष म्हणजे क्वाकरेली सायमंड (क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाला १४ व स्थान मिळवलं आहे.

याप्रमाणेच विद्यापीठाला लाभलेल्या १६१ वर्षाची परंपरा आबाधीत राहून सध्या सुरू असलेले सर्व गोंधळ लवकरात लवकर नष्ट व्हावे, अशीच सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे. मुंबई विद्यापीठाला जागतिक दर्जात टॉप १०० मध्ये स्थान मिळवण्यासाठी नवनियुक्त कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर मेहनत घेत असून विद्यापीठाला स्थान मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा