Advertisement

कधी येणार महापालिकेच्या शाळांमध्ये ‘ई-वाचनालय’?


कधी येणार महापालिकेच्या शाळांमध्ये ‘ई-वाचनालय’?
SHARES

आजच्या  आधुनिक काळात मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षण पद्धतीत बदल केला जात असतानाच आता ‘ई-वाचनालय’ची मागणी पुढे येवू लागली आहे. महापालिका शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आल्या आहेत. प्रत्येक महापालिका शाळांमध्ये संगणक लॅब तयार करत इंटरनेटद्वारे त्यांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या या वाढत्या प्रमाणामुळे पुस्तक वाचण्याची संस्कृती लोप पावली आहे. त्यामुळे तरुणांना पुस्तकवाचनाकडे पुन्हा आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी डिजिटलच्या माध्यमातून ‘ई-वाचनालय’ सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. पण पालिका शाळेत ही ई-वाचनालयाची सुविधा सुरू होणार कधी? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न. 


महापालिकेच्या शाळांमध्ये आता बदलत्या काळानुसार नवनवीन साधनांचा उपयोग करण्याच्यादृष्टीने बदल घडणे आवश्यक आहे. त्यापैकीच एक म्हणजे विद्यार्थ्यांना ‘ई-वाचनालय’ची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळा आणि विभागस्तरावर असलेल्या समाजकेंद्रांच्या इमारतींमध्ये आधुनिक यंत्रणेसह ‘ई-वाचनालय’ उभारण्यात यावे, अशी मागणी अमेय घोले यांनी ठरावाच्या सूचनेसह केली आहे.


महापालिका शाळांमधील मुलांनाही ‘किंडल’

आजचे युग हे संगणकीय युग असून संगणकाच्या माध्यमातून आंतरजाळाद्वारे (इंटरनेट) आता एका ‘क्लिक’वर विविध विषयांची माहिती घरबसल्या मिळू शकते. याचा उपयोग शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी निश्चित होत असतो. खासगी शाळांमध्ये श्रीमंत वर्गातील मुलांना संगणकावर ऑनलाईन पुस्तक वाचनाकरता ‘किंडल’सारखे साधन उपलब्ध होते. पण महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांच्या गरीब परिस्थितीमुळे या आधुनिक सुविधेचा लाभ त्यांना घरी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे ही सुविधा महापालिकेच्या शाळांमध्ये उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना नवनवीन सुविधांची ओळख होईल आणि आधुनिक युगाशी जोडले जातील, असा विश्वास घोले यांनी व्यक्त केला. शिवाय विद्यार्थ्यांना आपल्या घरी नेऊन पुस्तकांचे वाचन करण्याऐवजी किंडलवरील ऑनलाईन पुस्तक वाचनाचा आनंद घेता येईल. माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा उपयोग विविध विषयांची माहिती मिळवण्यासाठी आणि अनेक पुस्तके संदर्भित करण्याकरता निश्चितपणे होऊ शकेल, असेही घोले यांनी स्पष्ट केले.



हे देखील वाचा - 

गरीबांच्या मुलांसाठी खुलं वाचनालय


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा