Advertisement

महाविद्यालयांतील ७५ टक्के प्रवेश पूर्ण; आठवडाभरात ११वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता


महाविद्यालयांतील ७५ टक्के प्रवेश पूर्ण; आठवडाभरात ११वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता
SHARES

मागील अनेक महिन्यांपासून रखडलेली ११वी प्रवेश प्रक्रिया आता सुरळीत झाली आहे. नामांकित महाविद्यालयांतील ७५ टक्के जागांवरील प्रवेशही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीनंतर, पुढील आठवडाभरात ११चे वर्ग सुरू करण्याचा विचार महाविद्यालये करत असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या राज्यातील ११ची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. करोना आणि आरक्षणातील पेच यामुळे प्रवेश प्रक्रिया यंदा रखडली. नियमानुसार प्रवेश क्षमतेच्या ७५ टक्के प्रवेश झाले की ११वीचे वर्ग सुरू करता येतात. बहुतेक नामांकित महाविद्यालयांतील जागा यंदा पहिल्या फेरीतच भरल्या होत्या. मात्र, पहिली फेरी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर पहिल्या फेरीत आरक्षण लागू करून झालेले प्रवेश कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश होऊनही अनेक महाविद्यालयांनी वर्ग सुरू केले नाहीत. 

आता दुसऱ्या फेरीनंतर ११वीचे वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालये करत आहेत. दुसऱ्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरुवापर्यंत मुदत आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात ऑनलाइन वर्ग सुरू होऊ शकतील.

१०वी, १२वीच्या परीक्षा कधी होणार, त्या अनुषंगाने ११वीच्या वर्गासाठीचे शैक्षणिक वर्ष कसे असणार असे अनेक प्रश्न सध्या शाळा आणि महाविद्यालयांसमोर आहेत. ११वीचे पहिले सत्र संपले की विद्यार्थी १२वी आणि पुढील प्रवेश परीक्षांची तयारी सुरू करतात. १२वीच्या परीक्षा संपल्या की लगेच महाविद्यालयेही ११वीच्या परीक्षा घेतात.

यंदा मे महिन्यात १२वीच्या परीक्षा झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षांशी सांधून घेण्यासाठी मे-जूनपर्यंत ११वीचेही वर्ष संपवावे लागेल. म्हणजे पुढील ४ ते ५ महिन्यांत वर्षभराचा ११वीचा अभ्यासक्रमही महाविद्यालयाला पूर्ण करावा लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा