Advertisement

Special Story: लाॅकडाऊनची चिंता कशाला? सायनच्या डी.एस. हायस्कूलमध्ये भरतोय मोबाईल क्लास!

सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने मात्र या विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र लाॅकडाऊनमुळे हे वर्ग शाळेत भरत नसून ते भरताहेत चक्क मोबाईलवर.

Special Story: लाॅकडाऊनची चिंता कशाला? सायनच्या डी.एस. हायस्कूलमध्ये भरतोय मोबाईल क्लास!
SHARES

कोरोनामुळे नववीच्या विद्यार्थ्यांची अद्याप परीक्षाच झालेली नसली आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या 'ते दहावीत गेले' नसले, तरी सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने मात्र या विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र लाॅकडाऊनमुळे हे वर्ग शाळेत भरत नसून ते भरताहेत चक्क मोबाईलवर.

डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, "दहावीची परीक्षा ही करिअरच्या निवडीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची परीक्षा आहे. म्हणूनच दरवर्षी १ एप्रिलपासूनच आम्ही शाळेत दहावीचे विशेष वर्ग सुरू करतो.  त्यामुळे जूनमध्ये औपचारिक शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचा किमान २५ टक्के अभ्यास झालेला असतो. सुरुवातीपासूनच अभ्यासात घेतलेली ही आघाडी विद्यार्थ्यांना वर्षअखेरीस खूप कामी येते. बोर्डाच्या परीक्षेआधी उजळणी करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळतो." यंदा मात्र कोरोना संचारबंदीमुळे शाळेत वर्गच भरवणं शक्य नव्हतं. म्हणूनच "मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी झूम अॅपचा वापर करत मोबाईलवर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे नियमित वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे. एक एप्रिलपासून हे वर्ग मोबाईलवर भरत असून दररोज ४५ मिनिटांच्या तीन तासिका होत आहेत. सध्यातरी गणित, विज्ञान आणि इंग्रजी ह्या तीन विषयांची अधिकाधिक तयारी करण्यावरच शिक्षकांनी भर दिला आहे" असंही राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

इयत्ता नववीतून इयत्ता दहावीत जाणाऱ्या ५ तुकड्या असून त्यांत एकूण २८० विद्यार्थी आहेत. "काही विद्यार्थी घरी, तर काही गावी आहेत. मात्र मोबाईलच्या माध्यमातून ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नियमितपणे दहावीच्या विशेष वर्गाला उपस्थित राहत आहेत. आमचे शिक्षकसुद्धा हे वर्ग रटाळवाणे न होता हलक्याफुलक्या वातावरणात पार पडतील, याची विशेष काळजी घेत आहेत", अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक अंकुश महाडीक यांनी दिली.


  • मोबाईल वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातले सोपे भाग, अवांतर माहिती, हलक्याफुलक्या कविता, व्याकरण,  शब्दसंग्रह आदी बाबी शिकवण्यावर भर दिला जातोय.
  • इयत्ता आठवीसाठीची शिष्यवृत्ती तसंच होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षांच्या तयारीचेही वर्ग मोबाईलवर नियमितपणे होतायत..
  • शाळेच्या शिक्षकांसाठी दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत स्पोकन इंग्रजीचा वर्ग घेतला जातोय.

शाळेतील विज्ञानाचे शिक्षक डाॅ. संजय मोहिते सरांनी दहावीची पूर्वतयारी म्हणून आम्हाला झूम अॅपच्या माध्यमातून विज्ञानाचे धडे शिकवायला सुरूवात केली आहे. सुट्टीत घरी बसून कंटाळेलेलो असताना सरांच्या या मोबाईल वर्गांमुळे अभ्यासाचा आनंद लुटता येतोय. सरांचे मन:पूर्वक आभार. 

- प्राजक्ता सोनावणे, इयत्ता नववी


 "२७ मार्चपासून आम्ही शाळेतल्या शिक्षकांना मोबाईलवर वर्ग कसे घेता येतील, याबाबत मार्गदर्शन केलं आणि एक एप्रिलपासून इयत्ता सहावी ते दहावीचे नियमित वर्ग सुरू केले. संचारबंदीमुळे घरात बसून कंटाळलेले विद्यार्थीही मोबाईलवरच्या या वर्गांमध्ये मनापासून अभ्यास करताना दिसताहेत" असंही महाडीक यांनी सांगितलं.

"सर्व विद्यार्थी मोबाईल-फ्रेंड्ली आहेत. एखादं अॅप डाऊनलोड करण्यापासून ते पासवर्ड सेट करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना सहज जमतात. पालकांच्या परवानगीनेच मोबाईल हातात मिळत असल्यामुळे सर्व विद्यार्थी अत्यंत मन लावून अभ्यास करताहेत. त्यांनी केलेला अभ्यास आम्हाला पाठवतात. एरवी शाळेत वेळ न पाळणारी मुलं सध्या सुरु असलेल्या मोबाइल वर्गांमध्ये मात्र चक्क वेळेवर हजर असतात", असं पर्यवेक्षिका शुभांगी गायकवाड यांनी सांगितलं. शाळेतल्या वीसहून अधिक शिक्षक-शिक्षिकांना गायकवाड यांनी मोबाईलवर झूम अॅपचा वापर करून व्हिडिओ कसा बनवायचा, प्रझेंटेशन कसं करायचं, विद्यार्थ्यांचा अभ्यास वर्ग कसा घ्यायचा आदी मुद्दे समजावून सांगितले आहेत.

शाळेने मोबाइलवरच अभ्यास वर्ग घ्यायला सुरुवात केल्यामुळे मुलं घरात बसूनही नियमित अभ्यास करताहेत. त्यांचा वेळ वाया जात नाहीय. या अभिनव उपक्रमासाठी शाळेचे मन:पूर्वक आभार. 

- तन्वी पडवळ या विद्यार्थिनीची आई

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा