हिंदी, ऊर्दु माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या वाढतेय झपाट्याने


SHARE

प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी महापालिकेची असल्यानं इयत्ता चौथीच्या शाळा आता आठवीपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, चौथीतून पाचवीत प्रवेश घ्यायला मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलंच मिळेनाशी झाली आहेत. एवढंच काय तर सातवीनंतर आठवीत प्रवेश घ्यायला मराठी माध्यमांची मुलं फारच कमी असून त्या तुलनेत हिंदी आणि ऊर्दु माध्यमाच्या शाळांमधील मुलांचं प्रमाण लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे मराठीची संख्या कमी होऊन आता हिंदी आणि ऊर्दु माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या वाढताना दिसत आहे.


मराठी माध्यमांचे प्रवेश घटले

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा प्राधिकरणाची असून याअंतर्गत प्राथमिक शिक्षण हे इयत्ता १ ली ते ८वीपर्यंत करण्यात आलं आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे पूर्वी चौर्थीपर्यंत होतं, त्या शाळांमध्ये पाचवीचे वर्ग तर सातवीपर्यंतच्या शाळा असलेल्या आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीच्या वर्गात मराठीसह इंग्रजी, गुजराती आणि तेलगू माध्यमाच्या शाळांमध्ये एकाही मुलानं प्रवेश घेतलेला नाही.


मराठीची संख्या कमी

एकूण ७ शाळांमध्ये पाचवीचे वर्ग उघण्यात आले. यामध्ये एकूण ३९९ मुलांनी प्रवेश घेतला असून ऊर्दु माध्यमांच्या सर्वाधिक ४ वर्ग उघडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक २५९ मुलांनी प्रवेश घेतला आहे. त्याखालोखाल हिंदी माध्यमाच्या ५५ मुलांनी प्रवेश घेतला आहे.
तर आठ भाषिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग १२५ शाळांमध्ये सुरू करण्यात आले. 

यामध्ये मराठी माध्यमांच्या २५ शाळांमध्ये आठवीचे वर्ग उघडण्यात आले. त्यामध्ये एकूण २७९३ मुलांनी प्रवेश घेतला. तर हिंदी माध्यमांच्या ३० शाळांमधील आठवीच्या वर्गांमध्ये सर्वाधिक ८००८ मुलांनी प्रवेश घेतला. त्याखालोखाल ऊर्दु माध्यमाच्या १८ शाळांमधील वर्गांमध्ये ५५२३ मुलं तर इंग्रजीच्या ८ शाळांमधील वर्गांमध्ये ४२९८ मुलांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या मुलांची संख्या कमी होत असली तरी हिंदी आणि ऊर्दू माध्यमांच्या शाळांमधील मुलांची संख्या वाढत असल्याची आकडेवारी अहवालातून समोर आली आहे.

२०१४-१५मध्ये १०० प्राथमिक शाळांमध्ये ८वीचे वर्ग सुरू
२०१५-१६मध्ये ११६ प्राथमिक शाळांमध्ये १५२ वर्ग सुरू
२०१६-१७मध्ये पाचवीचे ३७ आणि आठवीचे १५३ वर्ग सुरू
२०१७-१८मध्ये पाचवीचे ६ आणि आठवीचे २४ वर्ग सुरू
२०१८-१९मध्ये पाचवीचे ७ तर आठवीचे १०३ वर्ग सुरू

संबंधित विषय
ताज्या बातम्या