Advertisement

१ ऑगस्टपासून सुरू होणार आयटीआय प्रवेश प्रक्रिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

१ ऑगस्टपासून सुरू होणार आयटीआय प्रवेश प्रक्रिया
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. प्रवेश प्रक्रियेनंतर आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं. (iti admission process in maharashtra will start from 1st august 2020)

कुणाला घेता येईल प्रवेश?

आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणं, आयटीआय केंद्रांची निवड करणं, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणं, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही योजना 

दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा. राज्यातील प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असं आवाहन कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केलं आहे.

हेही वाचा - अभ्यासक्रम कायमस्वरूपी वगळलेला नाही, शालेय शिक्षण विभागाचा खुलासा

दीड लाखाहून अधिक प्रवेशक्षमता

राज्यातील ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.

प्रादेशिक विभागनिहाय शासकीय व खाजगी संस्थांची संख्या व प्रवेशक्षमता पुढीलप्रमाणे आहे. अमरावती – ९० संस्था आणि १७ हजार ९८४ प्रवेशक्षमता, औरंगाबाद – १३३ संस्था आणि १९ हजार २६४ प्रवेशक्षमता, मुंबई – १०८ संस्था आणि २० हजार १२४ प्रवेशक्षमता, नागपूर – २४१ संस्था आणि २८ हजार १३६ प्रवेशक्षमता, नाशिक– २१८ संस्था आणि २९ हजार ५०० प्रवेशक्षमता, पुणे – १९६ संस्था आणि ३० हजार ८२० प्रवेशक्षमता.

आयटीआयचा फायदा

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते. तसंच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा