Advertisement

अभ्यासक्रम कायमस्वरूपी वगळलेला नाही, शालेय शिक्षण विभागाचा खुलासा

स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेल्या घटक तसंच उपघटकांवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यांचं मूल्यमापन असणार नाही, असं स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिलं आहे.

अभ्यासक्रम कायमस्वरूपी वगळलेला नाही, शालेय शिक्षण विभागाचा खुलासा
SHARES

कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी  इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. परंतु समाजशास्त्र आणि इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रामध्ये दिशाभूल करणारं व संभ्रम निर्माण करणारं वृत्त प्रकाशित करण्यात आल्याचं सांगून शालेय शिक्षण विभागाने यासंबंधी सविस्तर खुलासा केला आहे. (maharashtra school education department clarifies over cut syllabus)

पाठ्यक्रम स्वयंअध्ययनासाठी

इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून वगळलेले सर्व उपघटक हे स्वयं-अध्ययनासाठी आहेत. विद्यार्थी या उपघटकांचा स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात. स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेल्या घटक तसंच उपघटकांवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यांचं मूल्यमापन असणार नाही, असं स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिलं आहे. कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाविषयी विभागाने अधिक खुलासा केला आहे.

इतर घटकात उल्लेख

इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटक ६ मधील उपघटक ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’हा शालेय वर्ष २०२०-२१ साठीच फक्त कमी करण्यात आलेला आहे. कारण याविषयी घटक २ मधील ग्रामीण समाजाच्या समस्या यामध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पाठ वगळला असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही.

विविध शालेय विषयांच्या माध्यमातून तसंच पूर्वीच्या इयत्तांमध्ये सामाजिक शास्त्राच्या संदर्भाने ज्या घटक / उपघटकांचं अध्ययन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. अशा घटकांची पुनरावृती होऊ नये म्हणून फक्त या वर्षासाठी मूल्यमापनामधून वगळले आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये काही नवीन उपघटकांचा उदा. वृद्धांच्या समस्या, घरगुती हिंसाचाराची समस्या आणि व्यसन समस्या इत्यादींचा अभ्यासक्रमानुसार नव्याने समावेश केलेला आहे. पाठ्यपुस्तकामधील इतर पाठांमध्ये ज्या उपघटकांविषयी लिखाण माहिती समाविष्ट केली आहे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास अवघड वाटतील (समजून घेण्यास) असेच उपघटक चालू शैक्षणिक वर्षामध्ये मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाणार नाहीत. विद्यार्थी या उपघटकांचे स्वयंअध्ययन करु शकतात.

का वगळले घटक?

इयत्ता दहावी, इतिहास – राज्यशास्त्र व इयत्ता तिसरी ते दहावी या वर्गांच्या इतिहास – नागरिकशास्त्र – राज्यशास्त्र  या विषयांमधून उपरोक्त प्रकरणे, घटक, उपघटक शालेय वर्ष २०२०-२१ साठी कमी करण्यामागील कारणे विभागाने दिली आहेत. 

• इतिहास- राज्यशास्त्र या विषयाच्या इयत्ता दहावीच्या पाठ्यक्रमातील एकूण १३ प्रकरणांपैकी ३ प्रकरणे कमी करण्यात आलेली आहेत. यामध्ये इतिहासातील २ तर राज्यशास्त्र विषयातील एका प्रकरणाचा समावेश आहे.

• इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या दहावीच्या अभ्यासक्रमाची घटकनिहाय विभागणी पाहता प्रकरणे कमी करताना किंवा स्वयंअध्ययनास देताना ती प्रकरणे विविध घटकांतून कमी करण्यात आलेली आहेत हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. दहावीच्या संपूर्ण पाठ्यक्रमाचं घटकनिहाय विभाजन हे पाठ्यपुस्तकात दिलेलंच आहे. त्यानुसार संपूर्ण घटक न कमी करता विशिष्ट घटकातील प्रकरणांच्या स्वरूपातील काही भाग केवळ २०२०-२०२१  या शैक्षणिक वर्षात पुरताच कमी करण्यात आलेला आहे, तो पाठ्यपुस्तकातून कायमस्वरूपी कमी करण्यात आलेला नाही हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा - पहिली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

• माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा विशिष्ट असा घटकनिहाय अभ्यासक्रम ठरविण्यात आलेला आहे. इतिहास – राज्यशास्त्र या विषयातील जे पाठ्य घटक विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून  समजतील तसंच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाशी संबंधित असतील अशी प्रकरणे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन देण्यात आलेली आहेत. याची नोंद घ्यावी.

•  इतिहास विषयाचा विचार करता पाठ्यपुस्तकातील इतिहास संशोधन व इतिहास लेखन परंपरा हे घटक महत्त्वाचेच आहेत. उपयोजित इतिहास ही या पाठ्यपुस्तकाची मूळ कल्पना आहे. ऐतिहासिक ठेव्यांचं जतन हे इतिहासातले महत्त्वाचं मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमे आणि इतिहास तसंच खेळ आणि इतिहास या बाबी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाची संबंधित आहेत व त्यांचा अभ्यास करणं सहज सोपं आहे. ही प्रकरणे यावर्षी अभ्यासक्रमात तशीच ठेवण्यात आलेली आहेत.

•  भारतीय कलांचा इतिहास आणि मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाबाबत विद्यार्थी स्वयंअध्ययन आणि अवांतर वाचनाच्या आधारे माहिती मिळू शकतात त्यामुळे सदर प्रकरणे ही सन २०२०-२०२१  या शैक्षणिक वर्षापुरती पाठ्यक्रमातून अध्यापनासाठी कमी करून स्वयंअध्ययन करण्यासाठी देण्यात आलेली आहे.

•  इयत्ता दहावीच्या वर्षाकरीता  संविधानाची वाटचाल ही राज्यशास्त्र या विषयाची मूलभूत संकल्पना आहे. त्यानुसार संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी, भारतापुढील आव्हाने या घटकांचा समावेश हा राज्यशास्त्राच्या पाठ्यक्रमात करण्यात आलेला आहे.  शासनाच्या धोरणानुसार पाठ्यक्रम कमी करताना संविधाना संबंधी माहिती देणारे संविधानाची वाटचाल हे प्रकरण त्याचबरोबर लोकशाही प्रक्रियेशी संबंधित  निवडणूक प्रक्रिया व राजकीय पक्ष ही प्रकरणे, त्याचबरोबर लोकशाही सक्षम करणाऱ्या सामाजिक व राजकीय चळवळी ही प्रकरणे एकूणच पाठ्यक्रमात महत्त्वाची आहेत. त्यामुळे या वर्षी तशीच ठेवण्यात आली आहेत.

• भारतापुढील आव्हाने हे प्रकरण देखील पाठ्यक्रमात महत्वाचं आहे. परंतु भारतापुढील असलेल्या आव्हानाविषयी विद्यार्थी अलीकडच्या काळात विविध प्रसार माध्यमांच्या आधारे माहिती मिळवताना दिसतात. त्यामुळे हा पाठ विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्याच्या दृष्टीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच राज्यशास्त्रातील पहिली ४ प्रकरणे अध्ययनासाठी राखून शेवटचं प्रकरण भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनसाठी देण्यात आलेलं आहे.

यामध्ये कोणताही पाठ कमी  करण्यामागे विशिष्ट असा हेतू नाही. कारण संपूर्ण राज्यशास्त्र किंवा नागरिक शास्त्र हे विषय लोकशाही मूल्ये रुजवणारी आहेत. त्यामुळे त्यातील प्रत्येक पाठ महत्त्वाचा आहे. परंतु सध्याची स्थिती पाहता प्रत्येक विषयाचा पाठ्यक्रम कमी करावयाचा असल्याने भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने हा राज्यशास्त्रातील शेवटचा पाठ केवळ याच शैक्षणिक वर्षापुरता कमी करण्यात आलेला आहे. या कडे लक्ष वेधून, या  पाठातील घटक हे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून अभ्यासणं सोपं जाईल याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा