Advertisement

म्हणून अमेयने उपोषण मागे घेतलं

अमेय मालशे या एलएलबीच्या विद्यार्थ्याने मुंबईत विद्यापीठात उपोषण केले. आठवड्याभरात निकाल लावण्यात येतील या अश्वासनानंतरच त्याने उपोषण मागे घेतले.

म्हणून अमेयने उपोषण मागे घेतलं
SHARES

मागच्या ६ महिन्यांपासून निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी उद्रेक झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्यावर येत्या ६ दिवसांत सगळे निकाल लावू, असं आश्वासन विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दिलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं. 

परीक्षा होऊन ६ महिने झाले तरी निकाल न लागल्यानं हतबल झालेला 'लॉ' शाखेचा विद्यार्थी अमेय मालशे यानं मुंबई विद्यापीठाला व्यथा मांडणारं पत्र लिहिलं. या पत्रात त्यानं विद्यापिठाच्या चुकीमुळं विद्यार्थ्यांना कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे, याचा पाढाच वाचला शिवाय येत्या दोन दिवसांत निकाल लागला नाही, तर आत्महत्या करण्याचा इशाराही त्यानं दिला होता. 

आपल्या इशाऱ्यानुसार दुपारी १२ वाजता अमेयने इतर विद्यार्थ्यांसोबत उपोषणाला सुरूवात केली. केवळ 'लॉ'चे विद्यार्थीच नाही, तर इतर शाखेच्या विद्यार्थ्यांनीही अमेयला साथ देत जोपर्यंत निकाल लागणार नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. तर अमेयने अात्महत्येचा इशारा दिल्यावर अमेयच्या आई-वडिलांनी चिपळूणवरून थेट मुंबई विद्यापीठ गाठत त्याला आंदोलनात साथ दिली.

अखेर विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक संचालक अर्जुन घाटूळे यांनी येत्या ६ दिवसांत निकाल लावू, असं आश्वासन दिल्यावर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतलं.


मी केलेले उपोषण हे केवळ माझ्यासाठी नाही, तर सगळ्यांचे निकाल लागावेत यासाठी होतं. आठवड्याभरात निकाल लाऊ, असं अश्वासन दिल्यानं मी उपोषण मागे घेतलं आहे. आजपर्यंत आम्हाला झालेला त्रास विद्यापीठाला कळणार नाही.

- अमेय मालशे, लॉ विद्यार्थी




आमच्या मुलाने घेतलेला निर्णय धक्कादायक होता. आम्ही लगेच मुंबई गाठली. मी देखील याच विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आमच्यावेळी असा कधीच गोंधळ झाला नव्हता. मुलाने चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून आम्ही मुंबईत आलो आहोत. विद्यापीठाने आम्हाला लेखी उत्तर द्यायला हवे.

- स्मिता मालशे, अमेयची आई


केवळ स्वत:चा नाही तर आज सगळ्यांचे निकाल लागावेत यासाठी अमेय उपोषणाला बसला. सर्वच विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात आहेत. हे वर्ष वाया जाण्याची त्यांना भिती वाटत आहे. या भितीपोटी मुलाने चुकीचे पाऊल उचलू नये एवढीच आमची इच्छा आहे.

- प्रदीप मालशे, अमेयचे वडील



हेही वाचा -

दिवाळीच्या सुट्टीतही प्राध्यापकांना करावी लागणार पेपर तपासणी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा