विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांमुळे हतबल झालेल्या एका विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठाला पत्र लिहिले आहे. या पत्रात दोन दिवसात एल एल बीचे निकाल जाहीर करा, नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असे म्हटले आहे.
अमेय मालशे या एलएलबीच्या विद्यार्थ्याने विद्यापीठाला हे पत्र लिहिले आहे. त्यात त्याने निकाल रखडल्यामुळे होणारा त्रास विद्यापीठासमोर मांडला आहे. निकाल लागूनही चुकीच्या निकालांमुळे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, याची व्यथा अमेयने विद्यापीठाला लिहिलेल्या पत्रात मांडली आहे.
यात अमेयने विद्यापीठाला दोन दिवसांचा अवधी दिला आहे. या दोन दिवसांत मुंबई विद्यापीठाने लॉच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले नाहीत, तर आम्ही आत्महत्या करू, असा इशारा विद्यापीठाला दिला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ आणि लांछनास्पद निकालप्रक्रियेमुळे आपल्या पुढील शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित रहावे लागले आहे. विद्यापीठातील लाजिरवाण्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांच्या चुकांमुळे आपल्याला नापास शेरा मिळाला आहे. तर अनेकांचे परिक्षांचे पेपरच विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे गहाळ झाले असल्याने अद्याप अनेकांना निकालच मिळालेला नाहीये. अनेक विद्यार्थी आज या सर्व ताणतणावातून जात असताना विद्यापीठ प्रशासन मात्र या सगळ्याकडे मुद्दामहुन दुर्लक्ष करताना दिसून येतंय. आज निकाल न लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारिरीक संतुलन बिघडले आहे. आणि यातूनच आपल्या जिवाचे बरे वाईट करण्याचे विचार आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात येत आहेत, असे अमेयने विद्यापीठाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मी फक्त माझ्या एकट्याच्या निकालासाठी लढत नाहीये, तर लॉच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल लागावा, असे मला वाटते. जर दोन दिवसात निकाल लागला नाही, तर आम्ही आत्महत्या करणार आहोत. विद्यापीठाने या कारणामुळे जर केवळ माझा निकाल दिला, तरी तो मी स्विकारणार नाही.
अमेय मालशे, विद्यार्थी
हेही वाचा