
महाराष्ट्र (maharashtra) लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील गट 'ब' संवर्गातील औषध निरीक्षक पदासाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रिया रद्द (Cancel) करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत (Exam) अनियमितता झाल्याच्या तक्रारींनंतर झालेल्या प्राथमिक चौकशीअंती हा निर्णय घेण्यात आला.
आयोगाने 29 जुलै 2025 रोजी औषध निरीक्षक पदासाठी जाहिरात क्र. 116 /2025 प्रसिद्ध केली होती.
तसेच त्यानुसार, 22 मार्च 2026 रोजी राज्यभरातील सहा विभागीय मुख्यालयांमध्ये ऑफलाइन चाळणी परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेनंतर 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते.
यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 22 जुलै 2026 दरम्यान घेण्यात आल्या.
22 जुलै रोजी मुलाखती संपल्यानंतर, औषध निरीक्षक (Drugs inspector) पदासाठी पात्र ठरलेल्या 485 उमेदवारांसह आणि अपात्र ठरलेल्या तीन उमेदवारांचा समावेश असलेली 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली.
दरम्यान, 22 मार्च रोजी झालेल्या चाळणी परीक्षेतील अनियमिततेबद्दल काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून 22 ते 26 जुलै दरम्यान आयोगाला ईमेलद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या.
या तक्रारींमध्ये असा दावा करण्यात आला होता की, काही उमेदवारांना 20 मार्च रोजी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाले होते आणि ते सोशल मीडियावर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रसारित करण्यात आले होते.
या तक्रारींचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, आयोगाने 27 जुलै रोजी तपासासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली.
तसेच त्यानंतर, गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक तपास करून आयोगाला अहवाल सादर केला. या अहवालानुसार, प्रथमदर्शनी असे दिसून येते की, एका उमेदवाराने प्रश्नपत्रिका मिळवून त्याचा गैरफायदा घेतला.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, आयोगाद्वारे आयोजित परीक्षेची गोपनीयता, सचोटी, पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी तसेच आयोगावरील उमेदवारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यादरम्यान, या पदांसाठी फेरपरीक्षा घेण्यात येतील आणि उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही.
शिवाय, फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख आणि इतर तपशील एका स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले जातील.
हेही वाचा
