रात्रशाळेचा पहिला दिवस अंधारातच!

 Mumbai
रात्रशाळेचा पहिला दिवस अंधारातच!
Mumbai  -  

दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षकांना सरकारने कमी केल्याचा परिणाम रात्र शाळांवर झाला. मुंबईतील अनेक रात्र शाळा पहिल्या दिवशी उघडल्याच नाहीत. या शाळा बंद ठेवण्यात कोणत्याही शिक्षकाचा हात असून राजकीय दबावामुळे गुरूवारी रात्र शाळा बंद ठेवल्याचा अारोप महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषेदेचे शिवनाथ दराडे यांनी केला.

तिजोरीवरील भार कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने सकाळच्या सत्रासोबतच रात्रशाळेतही शिकवणाऱ्या शिक्षकांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा शिक्षकांवर केवळ एकाच सत्रात शिकवण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.

दुबार नोकरी करणारे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केवळ रात्रशाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना शाळा उघडू दिल्या नाहीत, असे मत यावेळी रात्र शाळेच्या कर्मचारी संघटनेने मांडले. रात्रशाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना सहीचे रजिस्टर नाकारण्यात आले. गेटसमोर उभे राहून जबरदस्तीने फोटो काढले. शासनाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशा आशयाच्या पत्रावर आमच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या, मात्र मी सही करायला नकार दिल्याचे, शिक्षक नंदकुमार सातपुते म्हणाले.

रात्रशाळा बंद करण्यात दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षकांचा हात आहे. या सगळ्या प्रकारात रात्रशाळेत शिकणारे विद्यार्थी भरडले जात आहेत. पण आम्ही मुलांचे नुकसान होऊ देणार नाही. रात्रशाळा अखंड सुरू राहतील, याविषयी आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती रात्रशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या दर्शना पांडवा यांनी दिली.

Loading Comments