Advertisement

विद्यापीठाच्या निकालांवर कुलगुरूंची करडी नजर


विद्यापीठाच्या निकालांवर कुलगुरूंची करडी नजर
SHARES

विविध परिक्षांच्या ऑनलाइन पेपर तपासणीत मुंबई विद्यापीठाला यंदा १०० टक्के गुण मिळाले आहेत. ऑनलाइन पेपर तपासणी सुरू केल्यावर गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत रखडलेले विद्यापीठाचे अर्ध्याहून अधिक निकाल यंदा नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या चोख नियोजनामुळं जुलैमध्येच विक्रमी वेळेत जाहीर झाले आहेत.

 दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई विद्यापीठातून टीवाय बीकॉमची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लाखोंच्या घरात होत्या. जवळपास ५ लाख ३३ हजार ५१२ उत्तरपत्रिकांची तपासणी साडेपाच हजार प्राध्यापकांद्वारे ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आली.


रोज पेपर तपासणीचा आढावा

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सुहास पेडणेकर यांनी इतर कार्यक्रम न करता पूर्ण लक्ष पेपर तपासणीवर केंद्रीत केलं. दररोज सकाळ-संध्याकाळ परीक्षा विभागात हजर राहून कुलगुरूंनी पेपर तपासणीचा आढावा घेतला. इतकचं नव्हे तर शनिवारी-रविवारीसुद्धा त्यांची परीक्षा विभागात उपस्थिती असायची. त्यांनी सर्व प्राचार्यांच्या भेटी घेऊन पेपर तपासणीची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसंच जे प्राध्यापक सुट्टीवर जाणार आहेत त्यांनी आधी पेपर तपासणीची जबाबदारी पार पाडून मगच सुट्टीवर जावं, असा आदेशही कुलगुरूंनी काढला होता.



अशी आहे विद्यापीठाची कामगिरी


  • पेपर तपासणीत प्राध्यापकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सर्वप्रथम सोडविण्यात आल्या. प्राध्यापकांना सुलभरित्या लवकरात लवकर  तपासणीसाठी उत्तरपत्रिका कशा उपलब्ध होतील याची काळजी घेण्यात आली.
  • विद्यापीठाच्या ४९० अभ्यासक्रमांपैकी १२३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
  • मार्च - एप्रिलमध्ये पार पडलेल्या परीक्षांपैकी ९० टक्के परीक्षांचे निकाल घोषीत
  • तांत्रिक शाखेच्या परीक्षा १५ जूनला संपल्या आहेत. या परीक्षांची ९५ टक्के पेपर तपासणी पूर्ण
  • बीए, बीकॉम, बीएस्ससी, बीएसस्सी आयटी चे ९० टक्के निकाल लागले असून आता पदव्युत्तर परीक्षांचे निकाल येत्या ३० दिवसांत लावण्यावर विद्यापीठाचा भर
  • ज्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळते असा बीएमएसचा निकालही १५ दिवसांपूर्वीच जाहीर झाला
  • सेमिस्टर-५ मध्ये पुनर्तपासणीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा निकालही वेळेआधीच जाहीर झाला. जेणेकरून विद्यार्थ्यांना सेमिस्टर-६ ला बसता यावे.
  • आता केवळ लॉ चे निकाल लावणे बाकी आहे. लॉ ची परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवडय़ात संपली


बीएचा निकालही जाहीर

विद्यापीठानं सोमवारी रात्री उशिरा टीवाय बीए सेमिस्टर सहाचा निकाल जाहीर केला. या परीक्षेसाठी एकूण १७ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १७ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.  या परीक्षेमध्ये एकूण १० हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बीएचा निकाल ७३.५९ टक्के इतका लागला आहे.

विद्यापीठानं बीए, बीकॉम, बीएसस्सी या नियमित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त निकाल जाहीर केले आहेत. तसंच येत्या काही दिवसात आयडॉलच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यास विद्यापीठ प्रशासन प्राधान्य देत आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचण येऊ नये, याची विद्यापीठाकडून दक्षता घेतली जात असून त्यादृष्टीने परीक्षा विभागातील यंत्रणा कामाला लागली आहे.


उन्हाळी सत्राच्या मूल्यांकनासाठी विविध विद्याशाखेचे अधिष्ठाते, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी केलेल्या कार्यामुळेच परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर झाले आहेत. याचे श्रेय या सर्वांना जाते. 

- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा - 

पावसात शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेकडे - तावडे

विद्यार्थ्यांना खूशखबर, डेटा सायन्समध्ये करता येईल स्पेशलायझेशन!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा