Advertisement

पावसात शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेकडे - तावडे


पावसात शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेकडे - तावडे
SHARES

मंगळवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबई जलमय झाली. अनेक ठिकाणी कंबरेभर पाणी साचलं. असं असताना मुंबईत अतिवृष्टी झाली नसल्याचं म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांना सुट्टी देण्याची गरज नसल्याचं म्हटलं नि त्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली.

या टिकेनंतर तावडे यांनी बुधवारी थेट मुंबई गाठली असून मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. तर ज्या शाळेच्या सुट्टीवरून तावडेंना टीकेला सामोर जावं लागलं त्या शाळेच्या सुट्टीचा अधिकार आता तावडेंनी थेट मुंबई महानगर पालिकेला दिला आहे. त्यानुसार आता मुंबईत मुसळधार पाऊस पडला, पाणी साचलं तर पालिका परिस्थितीचा आढावा घेत शाळेला सुट्टी द्यायची की नाही हे जाहीर करणार आहे.


सर्व शाळांना निर्णय लागू

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर पालिकेचा आपत्कालीन कक्ष परिस्थितीचा आढावा घेत सकाळी ६ वाजेपर्यंत सुट्टीचा निर्णय जाहीर करेल. तर पुढे दिवसभरात जसजसा पाऊस वाढेल त्याप्रमाणंही त्या त्या वेळेतही शाळेच्या सुट्टीचा निर्णय घेतील. या निर्णयाला शिक्षण विभागाची मंजुरी घेत तो निर्णय जाहीर करेल, अशी माहिती तावडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तर हा निर्णय पालिकेच्या शाळा, खासगी शाळा, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा सर्व शाळांना लागू होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


तुंबापुरीवर कृतीसमितीचा उतारा

पाऊस वाढल्यावर मुंबईतल्या सखल भागातच नव्हे तर इतर ठिकाणीही पाणी साचायला लागलं आहे. मुंबईची तुंबापुरी होत असताना पालिकेला मात्र या परिस्थितीवर मात करण्यात यश येताना दिसत नाही. त्यामुळं पावसात मुंबई ठप्प होत असून त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे तर दुसरीकडं पालिका आणि राज्य सरकारलाही यामुळं टीकेला सामोरं जावं लागतं आहे. असं असताना आता या तुंबापुरीवर तावडे यांनी कृतीसमितीचा उतारा पुढे आणला आहे.


व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे चर्चा 

पालिका, रेल्वे, एमएमआरडीए, म्हाडा, एमएमआरसी, बेस्ट, पोलिस यासारख्या यंत्रणांच्या प्रमुखांची अशी ही कृती समिती असेल. हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा दिल्याबरोबर ही कृती समिती व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे चर्चा करून पुढं काय पाऊलं उचलायची याचा निर्णय घेत आवश्यक त्या उपाययोजना करतील. तर पूरस्थिती निर्माण झालीच तर त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनाही या कृतीसमितीद्वारे त्वरीत केल्या जातील असंही तावडे यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

मेट्रो-३ च्या कामामुळं वरळी नाका महापालिका शाळेला तडे

रेल्वेची चिंधीगिरी, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावरी



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा