Advertisement

मेट्रो-३ च्या कामामुळं वरळी नाका महापालिका शाळेला तडे

कुलाब्यापासून सिप्झपर्यंत मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)च्या माध्यमातून मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. मेट्रो-३ च्या कामामुळं रहिवाशांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतोय, कामासाठी बॅरीगेटस लावून रस्ते बंद केल्यानं त्याचा फटका रहिवाशी-दुकानदारांना बसतोय, तर कधी पाइपलाइन फुटतेय तर वाहतूककोंडी होती. आता तर शाळा-महाविद्यालयांनाही मेट्रो-३ च्या कामाचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे.

मेट्रो-३ च्या कामामुळं वरळी नाका महापालिका शाळेला तडे
SHARES

काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीला मेट्रो-३ च्या कामामुळं तडे गेले होते, त्यापाठोपाठ आता वरळीतील महापालिका शाळेच्या दुरवस्थेसाठी मेट्रो-३ जबाबदार ठरताना दिसत आहे. वरळीतील सासमिरा महाविद्यालयासमोरील रस्ताही मेट्रो-३ च्या कामाच्या कचाट्यात आला आहे. या रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या असून रस्त्यावरून चालणं धोकादायक होताना दिसत आहे.

कुलाब्यापासून सिप्झपर्यंत मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)च्या माध्यमातून मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. मेट्रो-३ च्या कामामुळं रहिवाशांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतोय, कामासाठी बॅरीगेटस लावून रस्ते बंद केल्यानं त्याचा फटका रहिवाशी-दुकानदारांना बसतोय, तर कधी पाइपलाइन फुटतेय तर वाहतूककोंडी होती. आता तर शाळा-महाविद्यालयांनाही मेट्रो-३ च्या कामाचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे.


५०० हून अधिक विद्यार्थी

वरळी नाका इथं पालिकेची वरळी नाका प्राथमिक शाळा क्रमांक-३ शाळा आहे. मराठी, हिंदी, तेलगू आणि उर्दू भाषेतून या शाळेत शिक्षण दिलं जातं. ८ पर्यंती ही शाळा असून या शाळेत ५०० हून अधिक विद्यार्थी असल्याचं समजतं आहे. अशा या शाळेचं नूतनीकरण महापालिकेकडून २०१० मध्ये करण्यात आलं होतं. पण अवघ्या ४ वर्षांतच शाळेच्या स्लॅबचं प्लास्टर गळू लागलं आहे. तर पिलरला, काॅलमला आणि भिंतींना तडे गेले आहेत. प्लास्टर वा स्लॅब कधीही पडण्याची आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.


भुयारी कामाचा फटका

शाळेचं ४ वर्षापूर्वी नूतनीकरण झालेल्या शाळेच्या या दुरावस्थेला मेट्रो-३ चं काम जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक युवा सेना नेते अभिजीत पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला. शाळेजवळच मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचं काम सुरू असून त्याचा फटका इमारतीला बसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर याबाबत एमएमआरसीसह पालिकेकडे तक्रार नोंदवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


निकृष्ट कामामुळेच...

दरम्यान शाळेची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे असं असताना महापालिका आणि एमएमआरसी मात्र एकमेकांकडं बोट दाखवत असल्याचाही आरोप पाटील यांनी केला आहे. कारण एमएमआरसीकडे तक्रार केली असता एमएमआरसीनं पालिकेकडं बोट दाखवलं आहे. पालिकेनं नूतनीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानंच इमारतीला तडे गेल्याचं, इमारतीची दुरावस्था झाल्याचं एमएमआरसीनं पालिकेला एका पत्राद्वारे कळवल्याचीही माहिती पाटील यांनी दिली आहे.



आॅडिटची मागणी

एकीकडे एमएमआरसी पालिकेकडं, नूतनीकरणाचं काम करणाऱ्या कंत्राटदाराकडं बोट दाखवत हात वर करत असताना महापालिकाही एमएमआरसीलाच दोष देताना दिसत आहे. पालिकेनं मेट्रो-३ च्या कामामुळं इमारतीला हादरे बसत असून परिणामी इमारतीच्या भिंती, पिलर आणि काॅलमला तडे जात असून स्लॅबचं प्लास्टर गळत असल्याचं स्पष्ट केल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे. पालिका आणि एमएमआरसी हे दोघेही याला दुरावस्थेला कारणीभूत असल्याचं म्हणत पाटील यांनी आता या इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी केली आहे. तर इमारतीची दुरूस्ती त्वरीत एमएमआरसी आणि महापालिका दोघांनी मिळून करावी अशीही मागणी केली आहे.

तर या मागणीसाठी लवकरच शिक्षण समिती अध्यक्ष मंगशे सातमकर यांची भेट घेणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता शिक्षण समिती अध्यक्ष या प्रकरणाची कशी दखल घेतात आणि विद्यार्थ्यांना दिलासा कसा देतात हेच पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान एमएमआरसीच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.


हेही वाचा-

मेट्रो ३ चा ५ किमीचा भुयारी मार्ग पूर्ण

'एनजीटी'चा दणका! आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती कायम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा