Advertisement

रेल्वेची चिंधीगिरी, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावरी

तडे गेलेल्या रूळांना चिंधीनं बांधत अगदी काही मिनिटांतच रूळाची दुरूस्ती करत उद्योगी कर्मचाऱ्यांनी हार्बर रेल्वे सेवा सुरळीत करून दाखवली. ज्या दुरूस्तीसाठी तंत्रज्ञ आणि यंत्रसामग्रीची गरज होती ती दुरूस्ती केवळ एका चिंधीने करत या रूळावरून मध्य रेल्वेनं प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गाड्या बिनधास्तपणे सोडल्या. यालाच म्हणावं का 'मेक इन इंडिया' चिंधीगिरी!

रेल्वेची चिंधीगिरी, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावरी
SHARES

मुंबईकर ज्या लोकलला आपली लाइफलाइन मानतात ती लोकल चालवणारं रेल्वे प्रशासन मुंबईकर प्रवाशांची किती आणि कशी काळजी घेतं हे मंगळवारी प्रामुख्यानं दिसून आलं. मानखुर्द-गोवंडीदरम्यान रूळाला तडे गेले नि त्यावर मध्य रेल्वेतील उद्योगी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी रामबाण उपाय शोधून काढला. तो म्हणजे रूळाला चिंधी अर्थात कापड बांधण्याचा.

मग काय तडे गेलेल्या रूळांना चिंधीनं बांधत अगदी काही मिनिटांतच रूळाची दुरूस्ती करत उद्योगी कर्मचाऱ्यांनी हार्बर रेल्वे सेवा सुरळीत करून दाखवली. ज्या दुरूस्तीसाठी तंत्रज्ञ आणि यंत्रसामग्रीची गरज होती ती दुरूस्ती केवळ एका चिंधीने करत या रूळावरून मध्य रेल्वेनं प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गाड्या बिनधास्तपणे सोडल्या. यालाच म्हणावं का 'मेक इन इंडिया' चिंधीगिरी!


प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

रेल्वेचा हा चिंधी पराक्रम काही वेळातच मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आणि मग या चिंधीगिरीवर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या मध्य रेल्वेनं सेवा बंद करत आवश्यक ती दुरूस्ती करून घेत हार्बर सेवा सुरळीत केली खरी. पण त्या चिंधी बांधलेल्या रूळावरून गेल्या गाड्यांना आणि त्यातील प्रवाशांना काही झालं असतं तर? तर हा प्रश्न अधोरेखित करण्याची गरज आहे.


जीवाशी खेळ कशाला?

कारण प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार रेल्वेला दिला कोणी? रेल्वे सेवा खंडीत होण्याची, विस्कळीत होण्याची सवय मुंबईकरांना आहेच की. थोडा उशीर वा लोकल नसल्यास वेगवेगळे पर्याय निवडत घर वा आॅफिस गाठण्याची कसरत त्यांना काही नवी नाही. त्यामुळं झाला असता उशीर, केली असती मुंबईकरांनी तारेवरची कसरत. तेव्हा त्यांच्या काळजीपोटी, प्रवाशी रेल्वे स्थानकांवर अडकून पडू नयेत म्हणून चिंधीगिरी उद्योग करत प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याची खरंच गरज होती का? असा प्रश्न आता यानिमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे.



चाकरमान्यांची लोकल

मुंबई लोकलनं दररोज ७५ लाख मुंबईकर पोटापाण्यासाठी प्रवास करतात. देशाच्या रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येच्या निम्म्याहून अधिक अशी ही प्रवासी संख्या. तर जगातील सर्वाधिक घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालीपैकी एक अशी ही लोकल सेवा. जगात भारी मुंबई लोकलवारी ते उगाच नाही म्हणत. मुंबईतील बहुतांशी चाकरमानी मुंबईकराचं आयुष्य हे लोकलवर अवलंबून आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्यामुळं लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे.


प्रयत्नाच्या नावाने बोंब

सुदैवानं मंगळवारी रेल्वेच्या चिंधीगिरीचा फटका लोकल गाड्यांना वा प्रवाशांना बसला नाही. पण यानिमित्तानं रेल्वे कसं मुंबईकर प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे हे जगासमोर आलं ते मात्र छान झालं. पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वे मार्गांवर प्रवाशांसाठी सोयीसुविधांचा अभाव असल्यानं प्रवाशांना नेहमीच अडचणीत लोकल प्रवास करावा लागतो. तर याच अपुऱ्या सोयीसुविधांमुळे अपघातांचीही संख्या वाढत आहे. थोडासा पाऊस पडला नाही तर लोकल सेवा विस्कळीत होते. पाऊस वाढल्यानंतर मग लोकल सेवा ठप्पच होते. हेच वर्षानुवर्षे सुरू असून हे बदलण्यासाठी रेल्वेकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.


पैसा जातो कुठं?

लोकलचं रूपडं पालटण्यासाठी, लोकलमधील सुविधा सुधारण्यासाठी निधी येतो का, आला तर त्याचं पुढं काय होतं? हा एक मोठा प्रश्नच आहे. कारण लोकलमध्ये फार मोठ्या काही सुधारणा झाल्या आहे, लोकल बदलली आहे असं काहीच दिसत नाही. उलट दिवसेंदिवस लोकलची सेवा खराब होत चाललीय हेच खरं. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी, अंधेरी पूल दुर्घटना आणि पावसाळ्यात ठप्प होणारी सेवा ही याची उत्तम उदाहरणं म्हणता येतील.



प्रवासी नव्हे, गिनिपीग

एकीकडं ही अशी दयनीय स्थिती असताना दुसरीकडं रेल्वे प्रवाशांना गिनिपीग समजत चिंधी प्रयोग करताना दिसताहेत. तडे गेलेल्या रूळाला चिंधी बांधत लोकल गाड्या सोडण्याचा रेल्वे कर्मचाऱ्यांचा उद्योग हा आपल्या डोळ्यादेखत घडलेला उद्योग. न जाने रेल्वे असे किती उद्योग आपल्या मागे करत असेल आणि त्याचे काय-काय परिणाम आतापर्यंत झाले असतील वा यापुढेही होऊ घातले असतील.


गप्प कशाला बसायचं?

तेव्हा रेल्वेच्या चिंधीगिरीनंतरही प्रवाशांनी गप्प बसावं काय असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. कारण हा प्रकार अत्यंत गंभीर असल्यानं रेल्वेला याचं गांभीर्य दाखवून देण्याची गरज आहे, प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेले खेळ बंद करण्याची गरज आहे. त्यामुळं आता प्रवाशांनी, प्रवासी संघटनांनी पुढं येऊन यावर पावलं उचलण्याची खरी गरज आहे. तेव्हा अपेक्षा करू या प्रवासी आणि प्रवासी संघटना आपल्या सुरक्षेसाठी पुढं येतील. नाही तर मग मुंबईकरांचं, प्रवाशांचं आयुष्य हे रूळाला बांधलेल्या चिंधीसारखं मानून रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळायला मोकळीच आहे.



हेही वाचा-

नागपूरपेक्षा आमची मुंबईच बरी

मुख्यमंत्री म्हणतात, ''मुंबईत फक्त ४ हजार खड्डे''



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा