Advertisement

नागपूरपेक्षा आमची मुंबईच बरी


नागपूरपेक्षा आमची मुंबईच बरी
SHARES

आजवर मुंबईलाच पाणी तुंबतं. मुंबई महापालिका काहीच काम करत नाही. केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच करते, असा कांगावा विरोधी पक्षांकडून आणि पर्यायाने प्रसारमाध्यमांकडून होत असतो. मुंबई महापालिका काय काम करते, हे प्रशासनाने बेंबीच्या देठापासून ओरडून आणि पटवून सांगूनही त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. किंबहुना सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाची बाजू घेत यासर्व आरोपांचं खंडन करण्याचा प्रयत्नही केला.


पालिकेच्या मदतीला निसर्ग

तरीही पावसाळ्यात थोडं जरी पाणी तुंबलं कि आमचे दांडेकरी कॅमेरा घेऊन हिंदमाता,शीव, माटुंगा, मिलन सब वे, अंधेरी सब वे अशी ठिकाणं गाठून महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांचा पोलखोल करण्याचा प्रयत्न करतात. तुंबणाऱ्या मुंबईमुळे दरवर्षी महापालिकेला काम करूनही टिकेचं धनी व्हावं लागतं. प्रत्येक वेळी तुंबईचं चित्र रंगवून मुंबईचं विदारक चित्र दाखवलं जातं. पण अखेर या मुंबई महापालिकेच्या मदतीला निसर्गच धावून आलाय.


नागपूरात पूरसदृश्य स्थिती

नागपूरमध्ये जो काही मुसळधार पाऊस पडला आणि पाणीच पाणी चोहीकडे झालं. विधीमंडळाच्या प्रांगणासह मंत्र्यांचे बंगलेही तसंच विमानतळ पाण्याखाली गेला. संपूर्ण नागपूरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. पाणी ओसरायला वेळ लागला. यामुळे किमान मुंबईवर टिका करणाऱ्यांना नागपुरचं हे तुंबापुर झाल्यामुळे महापालिका किती शतपटीने काम करते याची प्रचिती आली. नागपूरला पाणी तुंबल्यानंतर उठसुठ मुंबईवर टिका करणाऱ्यांची एवढी जीभ लुळी पडली की तोंडातून शब्दच फुटत नव्हतं. त्यांच्या जिभेला लकवा मारलाय की काय असा प्रश्न आता सर्वांना पडू लागलाय.


निचरा करणारी यंत्रणा सक्षम

२६ जुलै २००५च्या महापुरानंतर मुंबईत ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत नाले व नदींच्या रुंदीकरणाची व खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली. सहा ठिकाणी पाण्याचा निचरा करणारी मोठी पंपिंग स्टेशन बनवण्यात आली. पावसाचे पाण्याचा निचरा करणारी सर्व यंत्रणा सक्षम बनवताना दरवर्षी नवनवीन प्रयोगही महापालिका प्रशासनाकडून केल्या जातात. नालेसफाई हा दरवर्षीचा कार्यक्रम असला तरी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सखल भागांमध्ये २९५ पंप लावणे, पावसाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना तैनात करणे. मॅनहोल्सवरील जमा झालेला कचरा बाजूला करणे, पर्जन्य जलवाहिनीचे पाणी मलनि:सारण वाहिनीचे मॅनहोल्समधून त्यात सोडणं. एवढंच नव्हे तर आपत्कालीन व्यवस्थापन राखून बोटींची व्यवस्थाही करणं ही सर्व यंत्रणा मुंबई महापलिका चोख राखते.


१५५ पाणी तुंबण्याची ठिकाणं

समुद्र सपाटीपासून खाली असणाऱ्या मुंबईला समुद्र आणि खाड्यांनी वेढलेलं आहे. मुंबईतील पावसाचं पाणी नाल्यांमधून खाड्यांमधून समुद्रात सोडलं जातं. ही सर्व भौगोलिक स्थिती पाहता सखल भागांमध्ये पाणी साचणं अपेक्षित आहेत. पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता कितीही वाढवली तरीही मुंबईतील पाणी तुंबण्याचं प्रमाण कमी होईल. पण ते बंद होणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण समुद्राला भरती असेल तर ओहोटीची वाट पाहीपर्यंत महापालिकेच्या हाती काहीच नसतं. त्यामुळे समुद्राला आहोटी लागल्यास हे पाणी भुर्रर्रकन निघून जातं. मुंबईची ही खासियत आहे. संपूर्ण मुंबईत १५५ पाणी तुंबण्याची ठिकाणं आहेत. त्यातील ५५ ठिकाणी यंदा पाण्याचा निचरा जलदगतीनं होत आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याची ठिकाणं कमीत कमी करण्याचा प्रयत्नही महापालिकेकडून सुरु आहे.


नागपूर महापालिकेला अपयश

महापालिकेच्या आयुक्तांसह, अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, उपायुक्त तसेच खात्यांचे प्रमुख अधिकारी एवढेच नव्हेतर महापौर आणि नगरसेवकही पाण्यात उतरुन काम करत असतात. महापालिकेचे कामगार आणि कर्मचारीही दिवस-रात्र एक होऊन मुंबईकरांना दिलासा मिळेपर्यंत काम करत असतात. नागपुरमधील पुरामुळे तरी मुंबई महापालिकेचं काम सरस आहे, हे दिसून आलं. नागपुरमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यानंतर तेथील महापालिकेला ही स्थिती निवारण्यास अपयश आलं. यातूनच मग मुंबई महापालिका किती शतपटीने चांगली काम करते हे तरी सर्वांना कळून चुकलं.


महापौरांचं अाव्हान

मुंबईत पावसात पाणी तुंबल्यानंतर, बुडवून दाखवले असे सांगत भाजपाकडून अप्रत्यक्ष शिवसेनेवर टिका केली जाते. नालेसफाईच्या कामांची पाहणी करून चौकशीची मागणी केली जाते. या सर्व पार्श्वभूमीवर नागपुरच्या घटनेनंतर मुंबईत कोल्हेकुई करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना उद्देशून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जे आव्हान दिलं हा सर्व राजकारणाचा भाग असू शकतो. याला तेवढं आम्हाला महत्व द्यायचा नाही. देश का विकास म्हणत एकाच वेळी प्रकल्प राबववायचं आणि त्याला राजकारण म्हणून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी विरोध करायचा हा सुध्दा राजकारणाचा भाग आहे. परंतु याच कारणामुळे मुंबई अधिक तुंबली जातेय हेही नाकारता येत नाही.


नागपूरचा कृती आराखडा नाही

नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. राजधानी मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे पाणी तुंबली की भाजपावाल्यांनी आरोप करायचे आणि नागपूरमध्ये भाजपाची सत्ता आहे त्यामुळे तिथं पाणी तुंबलं की शिवसेनेसह विरोधकांनी टिका करणं हे स्वाभाविक आहे. अशाप्रकारची राजकीय पोळी भाजून हे पक्ष स्वत:ला सक्षम आणि मजबूत बनवत असतात. परंतु नागपुरला पाणी का तुंबलं. त्याचा कृती आराखडा का बनवला नाही. या शहराचा आपत्कालीन व्यवस्थापनेचा आराखडा काय आहे, याची कुणीही विचारणा करत नाही. त्यामुळे आता तरी किमान नागपुरचा विकास आराखडा तयार करताना आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार व्हायला हवा.


मुख्यमंत्र्यांनी नागपूरकडं लक्ष द्यावं

राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख हे मुख्यमंत्री देवेंद फडवणीस हे आहेत. राज्याच्या आतत्कालीन परिस्थितीची माहिती देताना आपण याचे प्रमुख असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या बैठकीला एकाही महापौराला बोलावलं नाही. मुंबईच्या आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावरून मुख्यमंत्र्यांचा महापालिकेतील हस्तक्षेप आणि अधिकाराबाबत आरोप - प्रत्यारोप झाले. पण नागपुरमध्ये तुंबलेल्या या पाण्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर मुंबईपेक्षा नागपुरला लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, असं म्हणण्याची वेळ आली आहे. नागपुरला कधीही पावसाळी अधिवेशन भरलं जात नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशन नागपुरला भरवलं आणि असली नसलेली महापालिकेची इज्जत काढून घेतली.


जनतेची सुरक्षितता महत्वाची

राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जर नागपुरच्या महापालिकेला पावसाळ्यासाठी सज्ज ठेवली असती. त्यांच्याकडून उपाययोजना राबवून घेतल्या असत्या तरीही यावर मात करता आली असती. परंतु मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते राजकीय कुरघोडीतच रमलेत. त्यामुळे शिवसेनेच्या बुडाखाली लक्ष देता देता, स्वत:च्या बुडाखाली पाणी शिरलं तरी कळालं नाही. त्यामुळे आता मुंबई सोडा, पहिलं नागपुरकडेच पाहा. इतर शहरांकडे लक्ष द्या. राजकारण हा जरी आपला पिंड असला तरी या राज्यातील जनतेची सुरक्षितता ही सुध्दा महत्वाची आहे.


आरोप थांबण्याची अपेक्षा

राजकीय कुरघोडीसाठी मुख्यमंत्री आणि भाजपानं टिका करण्यापेक्षा जिथं खरोखरच लक्ष देण्याची गरज आहे, तिथं द्यायला हवं. तरच महाराष्ट्र आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम होईल. असो, नागपुरला पाणी तुंबल्यामुळे खरोखर आमचा महापालिकेचा कर्मचारी आनंदीत झाला असेल. हा आनंद नागपुरकरांना जो त्रास सहन करावा लागला याचा नसून यामुळे मुंबई महापालिकेचं काम कितीपटीनं चागलं आहे, हे दिसून आल्यामुळे झाला असेल. जे आमदार मुंबईवर तोंडसुख घेतात, त्याच आमदारांच्या मुखातून यापेक्षा आपली मुंबई बरी असे उद्गार बाहेर पडू लागले. हेच मुंबई महापालिकेसाठी मोठं सर्टीफिकेट आहे. त्यामुळे आता किमान नागपुरच्या घटनेनंतरही तरी मुंबईत तुंबणाऱ्या पाण्यामुळे महापालिकेवर होणारे आरोप आणि टिका थांबेल अशी अपेक्षा धरूया. तुर्तास एवढंच!



हेही वाचा -

मुंबईत पावसाचा जोर वाढणार - हवामान विभाग

राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा